NZ vs SL : रचीन रवींद्रच्या फिरकीची कमाल, न्यूझीलंडचा 61 धावांनी विजय, श्रीलंकेचं पराभवासह पॅकअप

New Zealand vs Sri Lanka Super 8 Match Result : न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बॅटिंगसह बॉलिंगने अप्रतिम कामगिरी करत एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह सेमी फायनलचा दावा मजबूत केला आहे.

NZ vs SL : रचीन रवींद्रच्या फिरकीची कमाल, न्यूझीलंडचा 61 धावांनी विजय, श्रीलंकेचं पराभवासह पॅकअप
Rachin Ravindra New Zealand vs Sri Lanka Super 8
Image Credit source: Icc X Account
| Updated on: Feb 25, 2026 | 11:24 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत न्यूझीलंडने श्रीलंकेवर मोठ्या फरकाने मात करत विजयाचं खातं उघडलं आहे. न्यूझीलंडचा सुपर 8 फेरीतील पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे न्यूझीलंडसाठी सेमी फायनलच्या हिशोबाने श्रीलंकेविरुद्धचा सामना फार अटीतटीचा होता. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याचं आयोजन हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे यजमान टीम घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांचं लक्ष लागून होतं. यजमान श्रीलंकेने सामन्यात अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने जोरदार कमबॅक करत सामन्यावर पकड कायम ठेवली आणि विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह सेमी फायनलचा दावा मजबूत केला आहे. तर श्रीलंकेचं पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

सामन्यात काय झालं?

श्रीलंकेने टॉस जिंकला. कॅप्टन दासून शनाका याने फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला झटपट झटके देत कॅप्टनचा निर्णय योग्य ठरवला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला झटके दिल्याने त्यांची स्थिती 12.1 ओव्हरमध्ये 6 आऊट अशी स्थिती झाली. न्यूझीलंडसाठी टॉप आणि मिडल ऑर्डरमध्ये रचीन रवींद्र 32, फिन एलन याने 23 तर ग्लेन फिलिप्स याने 18 धावांचं योगदान दिलं. दोघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर मार्क चॅपमॅन याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र 84-6 नंतर कॅप्टन मिचेल सँटनर आणि मॅककोंची या जोडीने गेमच फिरवला.

मिचेल सँटनर-मॅककोंची गेमचेंजर पार्टनरशीप

मिचेल सँटनर आणि मॅककोंची या दोघांनी सातव्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 84 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे न्यूझीलंडला 7 विकेट्स गमावून 168 धावांपर्यंत पोहचता आलं. सँटनरने सर्वाधिक 47 धावा केल्या. तर मॅककोंची याने नाबाद 31 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे न्यूझीलंडला श्रीलंकेसमोर 169 धावांचं सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. श्रीलंकेसाठी महीश तीक्षणा आणि दुष्मंथा चमीरा या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर दुनिथ वेल्लालागे याने 1 विकेट घेतली.

श्रीलंकेचं पॅकअप

न्यूझीलंडच्या मॅट हेनरी याने श्रीलंकेला त्यांच्या डावातील पहिल्याच बॉलवर पाथुम निसांका याला पहिल्याच बॉलवर आऊट केलं. मॅटने विकेट मेडन ओव्हर टाकली. मॅटने दिलेल्या सुरुवातीचा इतर गोलंदाजानी चांगला फायदा घेत श्रीलंकेला झटके देणं सुरु ठेवलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला ठराविक अंतराने झटके देत सामन्यावरची पडक कायम ठेवली. न्यूझीलंड श्रीलंकेला ऑलआऊट करण्यात यशस्वी ठरली नाही. मात्र श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 107 धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेसाठी कामिंदु मेंडीस याने 31 तर दुनिथ वेल्लालागे याने 29 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनी निराशा केली. न्यूझीलंडसाठी रचीन रवींद्र याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मॅट हेन्री याने 2 विकेट्स मिळवल्या. तर ग्लेन फिलीप्स आणि मिचेल सँटनर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

श्रीलंकेचा हा सुपर 8 फेरीतील सलग दुसरा पराभव ठरला. त्यामुळे श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं. श्रीलंकेला याआधी सुपर 8 फेरीत इंग्लंड विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीलंका या मोहिमेतील शेवटचा सामना हा 28 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.