IND vs AFG : विराट कोहली दुखापतीमुळे आऊट, ऋतुराज आणि यशस्वीपैकी कुणाला संधी? जाणून घ्या

India vs Afghanistan Odi Series Virat Kohli : अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याला दुखापत झाल्याने एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे चाहत्यांना विराटच्या कमबॅकसाठी आणखी काही आठवडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

IND vs AFG : विराट कोहली दुखापतीमुळे आऊट, ऋतुराज आणि यशस्वीपैकी कुणाला संधी? जाणून घ्या
Virat Kohli Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 06, 2026 | 10:28 PM

भारतीय क्रिकेटसाठी 6 जून हा दिवस महत्त्वाचा ठरला. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याला सुरुवात झाली. तसेच बीसीसीआय निवड समिताने दुपारी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी 16 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. तसेच टीम इंडियाचा टी 20 कर्णधार आणि उपकर्णधार बदलण्यात आला. सूर्यकुमार यादव याच्याकडून नेतृत्व काढण्यात आलं. तसेच सूर्याला आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या मालिकेसाठीही संघात स्थान दिलं नाही. श्रेयस अय्यर टी 20I कर्णधार म्हणून आता सूर्याची जागा घेणार आहे. तर अक्षर पटेल याच्याकडे असलेलं उपकर्णधारपद तिलक वर्मा याला देण्यात आलं आहे. तसेच भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्या दुखापतीबाबतही बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे.

टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड आधी अफगाणिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिज खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधीच विराटला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यामुळे विराटला या मालिकेत खेळता येणार नसल्याचं बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं. तसेच विराटच्या जागी बदली खेळाडूच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होणार आहे.

विराटच्या जागी कुणाचा समावेश?

विराटच्या जागी अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. यशस्वीची अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी आधी निवड करण्यात आली नव्हती. मात्र विराटची दुखापत यशस्वीच्या पथ्यावर पडली.

विराटला काय झालं?

विराटला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम सामन्यादरम्यान दुखापत झाली. तेव्हापासून विराट अफगाणिस्तान विरुद्ध खेळू शकणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र विराटला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या पहिल्याच द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे.

अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी सुधारित टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, प्रिंस यादव, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे

Follow Us