
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपली विजयी घोडदौड यशस्वीरित्या कायम राखली आहे. टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धेतील 36 व्या सामन्यात नेदरलँड्सवर विजय मिळवला आहे. टीम इंडियाने नेदरलँड्ससमोर 194 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेदरलँड्सनेही जोरदार झुंज देत शेवटच्या बॉलपर्यंत लढा दिला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर नेदरलँड्सचे प्रयत्न अपुरे पडले. नेदरलँड्सला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 176 धावाच करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे साखळी फेरीतील आपला सलग आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. तर नेदरलँड्स वर्ल्ड कप मोहिमेचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली. ऑलराउंडर शिवम दुबे हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शिवमने भारतासाठी सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानंतर दुबेने 2 विकेट्सही मिळवल्या. दुबेला या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कराने गौरवण्यात आलं.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 35 बॉलमध्ये 76 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे टीम इंडियाला 193 धावांपर्यंत पोहचता आलं. शिवम दुबे याने 31 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरसह 66 रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 34 आणि हार्दिकने 30 धावांचं योगदान दिलं. तसेच तिलक वर्मा याने 31 रन्स केल्या. तर नेदरलँड्ससाठी लोगन वॅन बीक याने 3 विकेट्स मिळवल्या. तर आर्यन दत्त याने दोघांना आऊट केलं.
नेदरलँड्सच्या आर्यन दत्त याला भोपळाही फोडता आला नाही. तर लोगन वॅन बीक हा 4 धावांवर नाबाद परतला. या व्यतिरिक्त नेदरलँड्सच्या इतर 7 फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा शानदार सामना करत दुहेरी आकडा गाठला. मात्र यापैकी एकालाही 33 पार पोहचता आलं नाही. नेदरलँड्ससाठी बास दी लिडे याने सर्वाधिक 33 धावा केल्या. मायकल लेविट याने 24, मॅक्स ओडॉड याने 20 धावांच योगदान दिलं. कुलीन एकरमॅन याने 23 रन्स केल्या. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने 15, झॅक लायन-कॅशे 26 आणि नोहा क्रोएस याने नाबाद 25 धावा केल्या.
टीम इंडियासाठी वरुण चक्रवर्ती याने 3 विकेट्स मिळवल्या. शिवम दुबे याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या दोघांनी 1-1 विकेट मिळवली. टीम इंडिया या सलग चौथ्या विजयासह साखळी फेरीत ए ग्रुपमधून नंबर 1 ठरली.