भुवीसमोर अर्शदीप सिंगने त्याचा सर्वात मोठा विक्रम मोडला, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात मोठी कामगिरी
Arshdeep Singh Record: एका कॅलेंडर वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंगने आता अव्वल स्थान पटकावले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सिरीजमधील दुसरा सामना आज क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अर्शदीप सिंगने भारतासाठी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने आपल्या चार ओव्हरमध्ये ३३ रन्स देऊन दोन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. या दोन विकेटसह त्याने एक विशेष विक्रम रचला आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात दोन विकेट घेतल्या. आपल्या चार ओव्हरच्या स्पेलमध्ये अर्शदीपने टिम सेफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांना बाद केले. यामुळे २०२६ मध्ये त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय बळींची एकूण संख्या ३८ झाली आहे. एका कॅलेंडर वर्षात या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंगने नवा विक्रम केला आहे.
अर्शदीप सिंगने यावर्षी आतापर्यंत २९ सामन्यांच्या २६ डावांमध्ये गोलंदाजी केली आहे. त्याने ९.२५ च्या इकॉनॉमी रेटने ३८ विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ५१ धावांत ५ विकेट ही आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याचा भारतीय विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर होता. २०२२ मध्ये भुवीने ३२ सामन्यांमध्ये ३७ विकेट घेतले होते. तर दुसरीकडे अर्शदीप सिंगने २०२४ मध्ये भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३६ विकेट घेतल्या आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अली दाऊदच्या नावावर आहे. या वेगवान गोलंदाजाने २०२५ मध्ये ३७ सामन्यांमध्ये ६३ विकेट घेतले आहेत. आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांतील गोलंदाजांमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम जोशुआ लिटलच्या नावावर आहे. या आयरिश वेगवान गोलंदाजाने २०२२ मध्ये २६ सामन्यांमध्ये ३९ बळी घेतले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान अर्शदीप सिंगला त्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
अर्शदीप सिंग हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने २०२२ मध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत १०१ सामन्यांमध्ये १४८ बळी घेतले आहेत. १५० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याची त्याला संधी आहे. या फॉरमॅटमध्ये जगात केवळ आठ गोलंदाजांनी १५० पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. सर्वात जलद १५० विकेट घेणारा वेगवान गोलंदाज होण्याची संधीही अर्शदीपला आहे.