IPL 2026 : 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकातील 10 प्रमुख मुद्दे, मुंबई इंडियन्सबाबत अपडेट काय?

IPL 2026 Full Schedule : बीसीसीआयने 11 मार्चला आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानंतर आता 26 मार्चला साखळी फेरीतील उर्वरित वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केलंय.

IPL 2026 : 19 व्या मोसमाच्या वेळापत्रकातील 10 प्रमुख मुद्दे, मुंबई इंडियन्सबाबत अपडेट काय?
IPL Shreyas Iyer and Rajat Patidar
Image Credit source: IPL
| Updated on: Mar 27, 2026 | 6:54 AM

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 नंतर क्रिकेट चाहत्यांना आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात टी 20 सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आयपीएलच्या 19 व्या हंगामातील पहिल्या फेरीत 16 दिवसांत 20 सामने आयोजित करण्यात आले आहेत. त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिल दरम्यान एकूण 4 डबल हेडरसह 20 सामने होणार आहेत. त्यानंतर  26 मार्च रोजी दुसऱ्या फेरीतील उर्वरित 50 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व 10 संघांचे प्रत्येकी 14 सामने कोणत्या स्टेडियममध्ये आणि कधी होणार? हे स्पष्ट झालं आहे. एकूण 12 शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने आयोजित करण्यात आले आहेत. या निमित्ताने आपण या 19 व्या मोसमातील वेळापत्रकाबाबत 10 प्रमुख मुद्दे जाणून घेऊयात.

केकेआर सलग 4 सामने घराबाहेर खेळणार

कोलकाता नाईट रायडर्स टीम 19 व्या पर्वात सलग 4 सामने घराबाहेर अर्थात प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राउंडवर खेळणार आहे. केकेआर घराबाहेर सलग 4 सामने खेळणारी पहिलीच टीम असणार आहे. तसेच केकेआर सलग 2 वेळा 3 सामने घरच्या मैदानात खेळणार आहे.

यलो आर्मी सलग 3 सामने घराबाहेर खेळणार

सर्वाधिक संयुक्तरित्या 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारी सीएसके सलग 3 सामने घराबाहेर खेळणार आहे. तसेच यलो आर्मी साखळी फेरीतील आपले 4 पैकी 3 सामने हे घरच्या मैदानात खेळणार आहे.

दिल्ली कॅपिट्ल्स

दिल्ली कॅपिट्ल्स सलग 3 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात खेळणार आहे. तर दिल्ली स्पर्धेदरम्यान 5 पैकी 4 सामने घरच्या मैदानात खेळणार आहे.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सही घराबाहेर 3 सामने खेळणार आहे. त्यानंतर पलटण 5 पैकी 4 सामने वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे.

गतविजेता आरसीबी

गतविजेता आरसीबी घरातील 2 सामन्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राउंडमध्ये 2 सामने खेळेल. आरसीबी त्यानंतर सलग 3 सामने होम ग्राउंडमध्ये खेळेल. तर आरसीबी अखेरच्या टप्प्यातील 2 सामने घरात खेळेल. तर  आरसीबी उर्वरित 2 सामने बाहेर खेळणार आहे.

राजस्थान रॉयल्स

आयपीएलच्या पहिल्या मोसमातील विजेता राजस्थान रॉयल्स 19 व्या हंगामातील आपले पहिले 4 पैकी 3 सामने घरात खेळणार आहेत. त्यानंतर ‘हल्ला बोल’ करणारी टीम सलग 3 सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या घरच्या मैदानात आव्हान देणार आहे.

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्स 19 व्या मोसमातील सलग 3 सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम या होम ग्राउंडमध्ये खेळणार आहे. मात्र गुजरातचे पहिले 4 पैकी 3 सामने हे होम ग्राउंडबाहेर होणार आहेत.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्सला साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या 4 पैकी 3 सामने घरच्या मैदानात खेळायचे आहेत. पंजाबसाठी ही मोठी संधी असणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद

सनरायजर्स हैदराबाद या मोहिमेतील पहिले 4 पैकी 3 सामने प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर हैदराबाद सलग 3 सामने घरच्या मैदानात खेळणार आहे.

लखनौची ‘धावा’धाव

दरम्यान लखनौ सुपर जायंट्सला सामन्यांसाठी सलग ‘धावा’धाव करावी लागणार आहे. लखनौला घरात आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात 2 पेक्षा सलग जास्त सामने खेळण्याची संधी मिळणार नाही.

Follow Us