आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, 51 वर्षीय गोलंदाजाने मैदान गाजवलं; काय केलं जाणून घ्या
Joanne Hicks Five-Wicket Haul: महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी20 फॉर्मेटमध्ये ऐतिहासिक विक्रमाची नोंद झाली आहे. वयाच्या 51व्या वर्षी गोलंदाजाने एका विक्रम नोंदवला आहे. या विक्रमाची आता क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.

महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आयल ऑफ मॅन आणि ग्रीस हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ग्रीस संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय त्यांच्या अंगाशी आला. ग्रीसने 15 षटकं खेळली आणि सर्व गडी गमवून फक्त 52 धावा केल्या. तसेच आयल ऑफ मॅनसमोर विजयासाठी 53 धावांचं आव्हान ठेवलं. या सामन्यात आयल ऑफ मॅनच्या 51 वर्षीय गोलंदाजाने कमाल केली. 51 वर्षीय फिरकीपटू जोआन हिक्स हीने ग्रीसच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली. रोमानियाच्या मोआरा व्लासी क्रिकेट मैदानात खेळलेल्या सामन्यात ग्रीसचा निम्मा संघ एकटीने बाद केला. वय वर्षे 51 आणि 173 दिवस असताना जोआन हिक्सने हा कारनामा केला. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 149 वर्षांच्या इतिहासात 50 वर्षानंतर पाच विकेट घेणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.
क्रिकेट इतिहासात जोआन हिक्सने या कामगिरीसह 96 वर्षे जुना विक्रमही मोडीत काढला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी फिरकीपटू बर्ट आयर्नमोंगर यांच्या नावावर होता. आयर्नमोंगर यांनी 1932 मध्ये दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वय वर्षे 49 आणि 314 दिवस असताना पाच विकेट घेण्याचा विक्रम केला होता. आता जोआनने 51व्या वर्षी ही कामगिरी करून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे जोआनने वयाच्या 47 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदापर्ण केल्यानंतर अवघ्या 4 वर्षात तिने हा कारनामा केला. जोआन हिक्सने 4 षटकात फक्त 10 धावा दिल्या आणि 5 विकेट काढल्या. तिच्या या कामगिरीच्या जोरावार आयल ऑफ मॅन संघाने विजय मिळवला. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरीसाठी जोआन हिक्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
जोआन हिक्सने घेतलेल्या पाच पैकी चार विकेट या त्रिफळाचीत आणि पायचीत होत्या. लिडिया कटसिमारीला बोल्ड, सोफिया-नेफेली जॉर्जोटा एलबीडब्ल्यू, अँजेलिकी-आयोआना अर्गीरोपोलो बोल्ड, थिओडोरा पॅरिसी-मेसिमेरी एलबीडब्ल्यू आणि अलेक्सांद्रा कुरकुलू झेल बाद केलं. जोआनने आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत तिसऱ्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. हा तिचा 29वा टी20 सामना होता. आतापर्यंत तिने 36 विकेट आपल्या नावावर केले आहेत.