Most Wickets in IPL 2026 : कगिसो रबाडा पर्पल कॅप विनर, भुवनेश्वर कुमारची संधी 1 विकेटने हुकली
IPL 2026 Match Most Wickets : भुवनेश्वर कुमार याच्याकडे आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक 3 वेळा पर्पल कॅप जिंकणारा गोलंदाज हा बहुमान मिळवण्याची संधी होती. मात्र कगिसो रबाडा याने तसं होऊ दिलं नाही.

रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 31 मे रोजी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर एकतर्फी विजय मिळवला. आरसीबीने महाअंतिम सामन्यातील विजयासह सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात रसीख सलाम डार याने बॉलिंगने उल्लेखनीय कामगिरी करत गुजरात विरुद्ध सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर विराट कोहली याने 156 धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक योगदान दिलं. त्यामुळे आरसीबीला विजय मिळवताना कोणतीच अडचण आली नाही. मात्र अंतिम सामना जिंकल्यानंतरही गुजरातच्या एका खेळाडूला पुरस्कार मिळाला.
कगिसो रबाडा पर्पल कॅप विजेता
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने पर्पल कॅप पटकावली. रबाडाने 29 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. रबाडाने अंतिम सामन्यात भुवनेश्वर कुमार याच्यापेक्षा 1 विकेट जास्त घेऊन ही कामगिरी केली. तर भुवनेश्वर कुमार याला 19 व्या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं.
रबाडा याच्या खात्यात अंतिम सामन्याआधी भुवनेश्वर कुमार याच्यापेक्षा 1 विकेट जास्त होती. रबाडाच्या नावावर 16 सामन्यांत 28 विकेट्स होत्या. तर भुवनेश्वर कुमार याने 15 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे पर्पल कॅपसाठी या दोन्ही गोलंदाजांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार हे निश्चित होतं.
आरसीबीने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय केल्याने भुवनेश्वरला विकेट घेण्याची संधी मिळाली. मात्र भुवी काही अंशी अपयशी ठरला. भुवीला फक्त 1 विकेटच मिळवता आली. त्यामुळे भुवीला रबाडाच्या विकेट्सची बरोबरीच करता आली. त्यानंतर रबाडाने दुसऱ्या डावात देवदत्त पडीक्कल याला आऊट केलं. रबाडाने यासह पर्पल कॅप मिळवली. रबाडाने देवदत्तला आऊट करत 19 व्या मोसमातील एकूण 29वी विकेट मिळवली.
रबाडाने 1 विकेटच्या जोरावर मिळवली पर्पल कॅप
Powerplay. Wickets. Match-winning spells 🔥
Kagiso Rabada had the perfect recipe this season to claim the Purple Cap 🧢👊#TATAIPL | #Final | #TheFinalLeap | #RCBvGT | @KagisoRabada25 pic.twitter.com/ddZLkanpWx
— IndianPremierLeague (@IPL) May 31, 2026
कगिसो रबाडा ठरला चौथा गोलंदाज
दरम्यान रबाडाने पर्पल कॅप जिंकताच खास कामगिरी केली. रबाडाची पर्पल कॅप जिंकण्याची ही दुसरी वेळ ठरली. रबाडाने 2020 साली 30 विकेट्स मिळवत पर्पल कॅप मिळवली होती. रबाडा यासह 2 वेळा पर्पल कॅप जिंकणारा चौथा गोलंदाज ठरला. रबाडाने यासह ड्वेन ब्राव्हो, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल या तिघांच्या विक्रमाची बरोबरी केली. या तिघांनीही एकूण 2 वेळा पर्पल कॅप पटकावली आहे.