NZ vs SL : कॅप्टन मिचेल सँटनरचा धमाका, श्रीलंकेविरुद्ध विक्रमी कामगिरी, काय केलं?

NZ vs SL Mitchell Santner : कॅप्टन मिचेल सँटनर याने न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्ध विजयी करण्यात बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान दिलं. सँटनरने यासह खास कामगिरी करुन दाखवली आहे. सँटनर न्यूझीलंडसाठी अशी कामगिरी करणा्रा पहिलाच खेळाडू ठरला आहे. जाणून घ्या.

NZ vs SL : कॅप्टन मिचेल सँटनरचा धमाका, श्रीलंकेविरुद्ध विक्रमी कामगिरी, काय केलं?
New Zealand Mitchell Santner
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 26, 2026 | 2:40 AM

न्यूझीलंड क्रिकेट टीमने बुधवारी 25 फेब्रुवारीला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने मिचेल सँटनर याच्या नेतृत्वात कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये श्रीलंकेला पराभूत करत सुपर 8 फेरीतील विजयाचं खातं उघडलं. न्यूझीलंडने या सामन्यात श्रीलंकेसमोर 169 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 107 धावांपर्यंतच पोहचता आलं. न्यूझीलंडला 61 धावांनी सामना जिंकल्याने नेट रनरेटमध्ये मोठा फायदा झाला.

सँटनरची ऑलराउंड कामगिरी

कर्णधार मिचेल सँटनर याने न्यूझीलंड क्रिकेट टीमला विजयी करण्यात बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. मिचेलने या सामन्यात नेतृत्वासह, बॅटिंग आणि बॉलिंग या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी कामगिरी केली. मिचेलने टीम अडचणीत असताना कोल मॅककोन्ची याच्यासह सातव्या विकेटसाठी रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशीप केली. या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला 168 धावांपर्यंत पोहचता आलं. त्यानंतर सँटनरने 1 विकेट घेत बॉलिंगनेही योगदान दिलं. सँटनरने या अष्टपैलू कामगिरीसह काही खास विक्रम केले आहेत. सँटनरने नक्की काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी

श्रीलंकेने न्यूझीलंडला झटपट झटके दिले. त्यामुळे न्यूझीलंडची 6 आऊट 84 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कोल मॅककोन्ची याच्यासोबत सँटनरने फक्त 47 बॉलमध्ये 84 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये सन्मानजनक 168 धावांपर्यंत पोहचता आलं. सँटनर आणि मॅककोन्ची या जोडीने वर्ल्ड रेकॉर्ड केला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वोच्च भागीदारी केली. सँटनर आणि मॅककोन्चीने हसी-स्मिथ या जोडीने 2010 साली बांगलादेश विरुद्ध सातव्या विकेटसाठी केलेल्या 74 धांवांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला.

1 हजार टी 20i धावा आणि 100 विकेट्स

सँटनरने न्यूझीलंडसाठी श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 47 धावा केल्या. सँटनरने या खेळीत 4 सिक्स आणि 2 फोरसह ठोकले. सँटनरने या दरम्यान 26 वी रन घेताच टी 20i क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण केल्या. सँटनरने 132 व्या सामन्यातील 88 व्या डावात 1 हजार धावा केल्या. सँटनर यासह 1 हजार टी 20 धावा करणारा न्यूझीलंडचा 13 वा फलंदाज ठरला. तसेच सँटनर यासह न्यूझीलंडसाठी टी 20i क्रिकेटमध्ये 1 हजार धावा आणि 100 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला.