PAK vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी पाकिस्तान टीम जाहीर, बाबरचं कमबॅक- रिझवान आऊट
PAK vs AUS Odi Series 2026 : पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 30 मे 4 जून दरम्यान वनडे सीरिजचा थरार रंगणार आहे. पीसीबी निवड समिती वनडे सीरिजसाठी टीम जाहीर केलीय. निवड समितीने या वनडे सीरिजसाठी 16 खेळाडूंना संधी दिली आहे. जाणून घ्या.

बांगलादेशने मायदेशात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट टीमचा सुपडा साफ केला. बांगलादेशने पाकिस्तानला टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने लोळवलं. त्यानंतर आता पाकिस्तानचा मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतून कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यजमान पाकिस्तानने या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मायदेशातील या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर सलमान अली आघा उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या मालिकेतून पाकिस्तान संघात काही खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. निवड समितीने कुणाला संधी दिलीय? याबाबत जाणून घेऊयात.
बाबर आझम याचं कमबॅक
पाकिस्तानच्या एकदिवसीय संघात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेतून अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याचं कमबॅक झालं आहे. बाबरला बांगलादेश विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी संधी देण्यात आली नव्हती. तसेच वेगवान गोलंदाज हारीस रऊफ, नसीम शाह आणि फिरकीपटू सुफयान मुकीम यांचंही कमबॅक झालं आहे. तर माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवान याला डच्चू देण्यात आला आहे.
31 महिन्यांनंतर कुणांचं कमबॅक?
तसेच पाकिस्तान टीममध्ये तब्बल 31 महिन्यानंतर स्पिनऑलराउंडर शादाब खान याला संधी देण्यात आली आहे. शादाबने अखेरचा एकदिवसीय सामना हा भारतात आयोजित वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत खेळला होता. तसेच रोहेल नझीर, अहमद दानियाल आणि अराफात मिन्हास या 3 नव्या दमाच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 30 मे, रावळपिंडी
दुसरा सामना, 2 जून, लाहोर
तिसरा सामना, 4 जून, लाहोर
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम : शाहीन शाह आफ्रिदी (कॅप्टन), सलमान अली आघा, अब्दुल समद, अबरार अहमद, अहमद दानियाल, अराफत मिन्हास, बाबर आझम, हरिस रौफ, माझ सदाकत, गाझी घोरी, नसीम शाह, रोहेल नजीर, साहिबजादा फरहान, शादाब खान, शामील हुसेन आणि सुफयान मोकीम.