अखेर त्याने Comming Soonची पोस्ट टाकली, आगरकरांसाठी अफगाणिस्तानविरुद्धची मालिका शेवटची ठरली?
भारताच्या माजी क्रिकेटरच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे टीम इंडियाच्या नव्या मुख्य निवडकर्त्याबाबतच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. त्याने एक्सवर नुकतीच ‘कमिंग सून’ अशी सूचक पोस्ट केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या निवड समितीमध्ये मोठा बदल होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच भारताचा माजी विकेटकीपर-फलंदाज पार्थिव पटेलची सिलेक्टर म्हणून निवड होणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरलाय. आता या चर्चेला आणखी हवा मिळालीये, ती स्वतः पार्थिवने शेअर केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे. पार्थिवने नुकतीच एक्सवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्याने फक्त ‘मी येत आहे’ (कमिंग सून) असं लिहिलंय. त्याने या पोस्टमध्ये कुठेही थेट भाष्य केलेलं नाही. पण आता तो नेमका कुठे येतोय, त्याच्या या सूचक पोस्टचा अर्थ नेमका काय घ्यायचा, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सध्यातरी नेटकरी आणि क्रिकेट वर्तुळात त्याच्या या पोस्टवरून तोच टीम इंडियाचा नवा सिलेक्टर असणार, असे तर्क लावले जात आहेत.
दरम्यान, टीम इंडियाचे सध्याचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाल काही दिवसांमध्ये संपणार असल्याचं बोललं जातंय. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाची कामगिरी आणि काही प्रमुख खेळाडूंच्या निवडीवरून आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीवर बरीच टीकाही होत होती. त्यामुळे आता या पदावर बीसीसीआय नेमकी कोणाची वर्णी लावणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या बदलाच्या चर्चेत अनेकांची नावे समोर आली, पण त्यामध्ये सर्वात वर नाव आलं ते पार्थिव पटेलचं.
Coming soon. I’m in. pic.twitter.com/C5Nfq8kv5b
— Parthiv Patel (@parthiv9) September 18, 2026
आता पार्थिवनेही स्वतःच ही एक्स पोस्ट शेअर केल्यानं या चर्चांना आणखी वेग मिळाला आहे. अजित आगरकर यांच्या जागी नवा मुख्य निवडकर्ता म्हणून तोच जबाबदारी स्वीकारणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगलीये. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर या बदलाची कितीही चर्चा सुरु असली तरी, सध्यातरी बीसीसीआय किंवा स्वतः पार्थिव पटेल या दोघांकडूनही अद्याप या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत घोषणा होत नाही, तोपर्यंत पार्थिवच्या या पोस्टचा सस्पेन्स कायम राहणार आहे.