PSL : डेविड वॉर्नर आणि मोईन अली यांच्यात भर मैदानात राडा, Viral Video नंतर दिलं स्पष्टीकरण
पाकिस्तानात टी20 लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आयपीएलमधून वगळलेले डेविड वॉर्नर आणि मोईन अली हे क्रिकेटपटू खेळत आहे. दोघंही कराची किंग्सचा भाग आहेत. पण या दोघांमध्ये वाद झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाकिस्तान क्रिकेट लीग स्पर्धेत रोज काही ना काही वाद होत असतो. एक तर भिकेचे डोहाळे लागले आहेत. त्यातही खिसा फाटका असताना लीग स्पर्धेचं आयोजन केलं आहे. पाकिस्तानचा पीएसएल स्पर्धेचं 11वं पर्व सुरू आहे. आयपीएल स्पर्धेत रोज नवे विक्रम रचले आणि मोडले जात आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत रोज नवा वाद जन्म घेत आहे. बॉल टॅम्परिंग असो की विवादित सोशल मिडिया पोस्ट, यामुळे पाकिस्तान क्रिकेटची जगभरात नाचक्की झाली आहे. आता कराची किंग्सचा कर्णधार डेविड वॉर्नरचा एक भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. भांडण दुसऱ्या संघाच्या खेळाडूशी नाही तर संघ सहकारी असलेल्या मोईन अलीशी झालं आहे. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात
आयपीएल स्पर्धेतून वगळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेविड वॉर्नर आणि इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू मोईन अली एकाच संघातून खेळत आहेत. दोघंही कराची किंग्स संघाचा भाग आहेत. कराची किंग्सने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. तसेच सुरूवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तिसरा विजय 2 एप्रिल 2026 रोजी रावलपिंडीजविरुद्ध मिळवला. या सामन्यात कराची किंग्सने 198 धावांचं लक्ष्य 5 गडी गमवून गाठलं. या विजयानंतर कराची संघाचे खेळाडू आणि चाहते खूश होते. पण सामना संपल्यानंतर एक विचित्र प्रकार समोर आला. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामना संपल्यानंतर कराचीचे खेळाडू मैदानात हस्तांदोलन करण्यासाठी उतरले. तेव्हा कर्णधार वॉर्नर मोईन अलीच्या दिशेने तावातावाने गेला आणि काही तरी बोलू लागला. मोईन अली त्याला फक्त पाहात होता. त्यानंतर संघाचे डायरेक्टर हैदर अजहर यांनी मध्यस्थी केली आणि वॉर्नरला बाजूला घेऊन गेले. पण तरी वॉर्नर काही तर बोलत होता. त्यानंतर हैदर अजहर मोईन अलीशी बोलू लागले.
डेविड वॉर्नरने दिलं असं स्पष्टीकरण
व्हायरल व्हिडीओ रिपोस्ट करत डेविड वॉर्नर म्हणाला की, मी हैदर अजहरला सांगितलं की त्याने पहिलं जावं आणि हात मिळवावा. दुसरीकडे, हैदर अजहर यांनी या वादावर स्पष्टीकरण देत सांगितलं की, हे खरं नाही. ते दोघं माझी मस्करी करत होते. व्हायरल व्हिडीओ आणि स्पष्टीकरण पाहाता त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. या व्हिडीओत कुठेच थट्टा मस्करी किंवा कोणी हसताना दिसत नाही. त्यामुळे पुढे या प्रकरणाला काय वळण लागतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल.