RCB vs KKR : अंगकृषचा तडाखा, रिंकूचा फिनिशिंग टच, आरसीबीसमोर 193 रन्सचं टार्गेट, केकेआर रोखणार?

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders 1st Innings, IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सने करो या मरो सामन्यात आरसीबी विरुद्ध जबरदस्त कामगिरी करत 190 पार मजल मारली. त्यामुळे आता केकेआर विजयी पंच लगावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

RCB vs KKR : अंगकृषचा तडाखा, रिंकूचा फिनिशिंग टच, आरसीबीसमोर 193 रन्सचं टार्गेट, केकेआर रोखणार?
Angkrish Raghuvanshi and Rinku Singh
Image Credit source: Bcci
| Updated on: May 13, 2026 | 11:39 PM

कोलकाता नाईट रायडर्सने पावसाने प्रभावित झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 57 व्या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. केकेआरच्या पाचही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. मात्र वनडाऊन आलेल्या अंगकृष रघुवंशी याने सर्वाधिक धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी उपकर्णधार रिंकु सिंह याने नाबाद 49 धावा करत फिनिशिंग टच दिला. त्यामुळे केकेआरला करो या मरो सामन्यात 190 पेक्षा अधिक धावा करता आल्या. त्यामुळे आता केकेआरचे गोलंदाज 192 धावांचा यशस्वी बचाव करणार की आरसीबी जिंकणार? याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

पहिल्या डावात काय झालं?

रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पावसाने विघ्न घातलं. त्यामुळे तब्बल 1 तास 15 मिनिटांचा खेळ वाया गेला. मात्र त्यानंतरही ओव्हर कमी करण्यात आल्या नाहीत. साडे आठ वाजता टॉस झाला. आरसीबीने टॉस जिंकला. कॅप्टन रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. सामन्याला रात्री पावणे नऊ वाजता सुरुवात झाली.

केकेआरची बॅटिंग

फिन एलन आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी केकेआरला संयमी सुरुवात मिळवून दिली. मात्र दोघेही या सुरुवातीचा फायदा घेण्यात अपयशी ठरले. कॅप्टन अजिंक्यने 13 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 3 फोरसह 19 रन्स केल्या. तर फिन एलन याने 8 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 18 धावा केल्या. त्यानंतर वनडाऊन आलेल्या अंगकृष रघुवंशी याने तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी कॅमरुन ग्रीन आणि रिंकु सिंह यांच्यासह अर्धशतकी भागीदारी केली.

अंगकृष आणि कॅमरुन या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 46 बॉलमध्ये 68 रन्सची पार्टनरशीप केली. कॅमरुन ग्रीन चांगल्या रंगात खेळत होता. मात्र आरसीबीने ग्रीनला निर्णायक क्षणी आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ग्रीनने 24 चेंडूत 1 सिक्स आणि 3 फोरसह 32 रन्स केल्या. त्यानंतर अंगकृषने रिंकुसह फटकेबाजी करत केकेआरला 192 धावांपर्यंत पोहचवलं.

लाईव्ह स्कोअरकार्ड

अंगकृष आणि रिंकुची जबरदस्त बॅटिंग

अंगकृष आणि रिंकु या दोघांनी 46 बॉलमध्ये 76 रन्स जोडल्या. अंगकृष चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शेवटच्या चेंडूवर रन आऊट झाला. अंगकृषने सर्वाधिक धावा केल्या.अंगकृषने 46 चेंडूत 154.35 च्या स्ट्राईक रेटने 71 धावा केल्या. अंगकृषने या खेळीत 3 षटकार आणि 7 चौकार लगावले. तर उपकर्णधार रिंकु सिंह अर्धशतकापासून 1 धावेने दूर राहिला. रिंकुने 29 बॉलमध्ये 168.97 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 49 रन्स केल्या. रिंकुने या खेळीत 2 सिक्स आणि 3 फोर खेचले. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड आणि रसीख सलाम डार या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us