SAW vs INDW : टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिका 8 विकेट्सने विजयी
South Africa Women vs India Women 2nd T20I Match Result : दक्षिण आफ्रिकेच्या महिला ब्रिगेडने आधी टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. त्यानंतर चौघींनी विजयी आव्हान पूर्ण करत टीम इंडिया विरुद्ध सलग दुसरा सामना जिंकला.

वनडे वर्ल्ड कप विजेता वुमन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी 20i मालिकेतील (Women India Tour Of South Africa 2026) सलग दुसऱ्या सामन्यातही निराशा केली आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेने सलग दुसरा विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. टीम इंडियाने लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान हे अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात 17 बॉलआधी पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 17.1 ओव्हरमध्ये 148 रन्स करत विजय नोंदवला.
टीम इंडियाकडून निराशा
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पाहुण्या टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाला संपूर्ण 20 ओव्हर खेळल्यानंतरही 150 धावाही करता आल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला डावातील शेवटच्या चेंडूवर 147 रन्सवर ऑलआऊट केलं. टीम इंडियासाठी शफाली वर्मा व्यतिरिक्त डेब्युटंट अनुष्का शर्मा हीने सन्मानजनक धावा केल्या. तर इतरांनी दक्षिण आफ्रिकेसमोर गुडघे टेकले.
शफालीने 38 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह 57 रन्स केल्या. तर अनुष्काने 31 चेंडूत 28 धावा केल्या. त्याव्यरिक्त कुणालाही 20 हा आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर इतर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत टीम इंडियाला ऑलआऊट करण्यात योगदान दिलं.
दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा विजय
दक्षिण आफ्रिकेची विजयी धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात झाली. कॅप्टन लॉरा वॉल्वार्ड आणि सुने लुस या सलामी जोडीने शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजय निश्चित केला. या दोघींनी 106 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ठराविक अंतराने आऊट झाल्या. मात्र दोघींनी दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला. लॉराने 34 बॉलमध्ये 54 रन्स केल्या. तर सुनेने 46 चेंडूत 57 धावा जोडल्या. तर तान्झिम ब्रिट्स हीने 20* आणि ॲनेरी डर्कसेनने 12* धावा करत दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं. टीम इंडियासाठी एकट्या श्रेयांका पाटील हीने दोन्ही विकेट्स मिळवल्या.
टीम इंडियाचा 8 विकेट्सने धुव्वा
🚨 MATCH RESULT 🚨
An excellent performance to back up the first T20I as #TheProteas seal victory by a comprehensive 8 wickets! 😎🇿🇦
They move 2-0 up in the series as attention now turns to Johannesburg this coming Wednesday. 🏏#Unbreakable pic.twitter.com/SAFpHibGgh
— Proteas Women (@ProteasWomenCSA) April 19, 2026
तिसरा सामना कधी आणि कुठे?
दरम्यान उभयसंघातील तिसरा टी 20i सामना हा बुधवारी 22 एप्रिलला होणार आहे. टीम इंडियाला मालिका गमवायची नसेल तर कोणत्याही स्थितीत तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया यजमानांना सलग तिसऱ्या विजयापासून रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं औत्सुक्यांचं ठरणार आहे.