चार विश्वचषकांचा अनुभव, वय फक्त ३०; धुरंधर वेगवान गोलंदाजाची अचानक निवृत्ती, निर्णयामागचं कारण मनाला चटका लावणारं
Brad Wheal Retirement: ज्या गोलंदाजाने वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माला बाद केलं, त्यानेच वयाच्या ३० व्या वर्षी क्रिकेट सोडलं. अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.

क्रिकेट जगताला एक धक्कादायक बातमी मिळाली आहे. चार टी-२० विश्वचषकांमध्ये सहभागी झालेल्या स्कॉटलंडचा वेगवान गोलंदाज ब्रॅड व्हीलने वयाच्या ३० व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी त्याने व्यावसायिक क्रिकेटला रामराम ठोकला. आफ्रिकेत जन्मलेल्या या ३० वर्षीय खेळाडूने २०१६ मध्ये हॉंगकॉंगविरुद्ध स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो स्कॉटलंडसाठी एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही प्रकारात खेळला. त्याला संघात संधी मिळत राहिली.
भारतात होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठीच्या स्कॉटलंडच्या संघातही त्याचा समावेश होता. त्याने आपला शेवटचा सामना टी-२० विश्वचषकात खेळला. वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे ब्रॅडने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला की, हॅम्पशायरमधील माझा काळ आणि एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून स्कॉटलंडचे प्रतिनिधित्व करणे मला खूप आवडले. पण दुर्दैवाने वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे मला क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
तो पुढे म्हणाला की, हा निर्णय सोपा नव्हता, पण मी त्यावर पूर्णपणे समाधानी आहे. माझ्या पाठीला चार स्ट्रेस फ्रॅक्चर्स आहेत आणि. माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. एकंदरीत माझे शरीर आता वेगवान गोलंदाजीची आव्हाने पेलू शकत नाही. स्कॉटलंडसाठी खेळण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी नेहमीच खूप महत्त्वाचे राहिले आहे आणि मला त्याचा नेहमीच प्रचंड अभिमान वाटेल. मला चार विश्वचषकांमध्ये स्कॉटलंडचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले आणि या प्रवासात मला काही अविश्वसनीय अनुभव मिळाले.
मी काही चांगले मित्र बनवले आणि काही सर्वोत्तम लोकांसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली. कदाचित याच गोष्टींची मला सर्वाधिक आठवण येईल. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचा, प्रशिक्षकांचा आणि सपोर्ट स्टाफचा मनापासून आभारी आहे, ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्षे काम केले आहे. मी स्कॉटलंडच्या सर्व चाहत्यांचेही त्यांच्या वर्षानुवर्षे दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो, विशेषतः जे आम्हाला पाठिंबा देण्यासाठी जगभरातून प्रवास करून आले आहेत. त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी नेहमीच खूप महत्त्वाचा राहिला आहे, असं त्याने सांगितले.
ब्रॅड व्हीलने पुढे सांगितले की, हा माझ्या कारकिर्दीचा एक मोठा भाग होता आणि मी त्या आठवणी नेहमीच चांगल्या प्रकारे जपून ठेवीन. मी निश्चितपणे मुलांवर बारकाईने लक्ष ठेवून असेन आणि त्यांना दुरूनच पाठिंबा देत राहीन. ब्रॅड व्हीलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १८ एकदिवसीय आणि २६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. १७ एकदिवसीय डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने २३.०७ च्या सरासरीने २७ बळी घेतले असून, ३/३४ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. उर्वरित २५ टी-२० आंतरराष्ट्रीय डावांमध्ये या स्कॉटिश खेळाडूने ३/२० या सर्वोत्तम कामगिरीसह २४ बळी घेतले आहेत. यामध्ये त्याने ८.६० च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.