
मुंबई : टीम इंडियाने वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याला संधी मिळाली नाही. नाराज झालेल्या चहलने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयनेही त्याला खेळण्याची परवानगी दिली होती. काऊंटी क्रिकेटमध्ये केंट संघाकडून चहलने डेब्यू करत पहिल्याच दिवशी राडा केला आहे. सोशल मीडियावर चहलने घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
युजवेंद्र चहलने नॉटिंगहॅमशायरच्या लिंडन जेम्सला चारीमुंड्य चीत केलं. चहलचा चेंडू डिफेंड करण्याच्या प्रयत्नात तो बोल्ड झाला. चहलच्या या चेंडूवर जेम्सकडे काहीच प्रत्युत्तर नव्हतं. चहलने फक्त एकच नाहीतर त्यानंतरही दोन विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली. चहलने 52 धावा देत 3 विकेट घेतल्या.
What a peach from Yuzvendra Chahal in the County Championship.pic.twitter.com/ej1A4vuX5z
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 11, 2023
केंट संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटींग करताना केंट संघाने 446 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर फलंदाजासाठी आलेल्या नॉटिंघमशार संघाची अवस्था खराब आहे, पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांना पहिला धक्का बसला होता. त्यानंतर कर्णधार स्टिवन मुल्लानेयने ८६ धावा करत डाव सावरला होता. मात्र इतर कोणला मोठी खेळी करता आली नाही. चहलने आपला जलवा दाखवला, पठ्ठ्याने तीन विकेट घेतल्या.
दरम्यान, चहलला संघात जागा मिळावी अशी मागणी अनेक क्रिकेटपटूंनी केली आहे. 2021 साली सुद्धा त्याला वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं नाही. भारतासाठी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. आता वन डे क्रिकेट वर्ल्ड कपमध्येही त्याला स्थान न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.