GK: कोणाच्या सांगण्यावरून क्रीडा संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो? कसं ठरवलं जातं? नियम समजून घ्या
भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग निळ्यावरून भगवा करण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. यापूर्वी भारतीय संघ निळ्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरत होती. पण जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय अखेर कोण घेतं? चला जाणून घेऊयात सविस्तर

नेदरलँड आणि बेल्जियममध्ये हॉकीची एफआयएच वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा पुरूष आणि महिला संघ सज्ज झाला आहे. हॉकी वर्ल्डकप स्पर्धा 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान आहे. पण या स्पर्धेला जाण्यापूर्वी जर्सीच्या रंगावरून वाद पेटला आहे. कारण भारतीय संघ भगव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाची निळी जर्सी बदलण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. रंग बदलण्याची काय गरज होती? आंतरराष्ट्रीय पातळीवर जर्सीचा रंग आणि डिझाईन ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? यासाठी काय नियम आहेत? जाणून घेऊयात सविस्तर.
खेळाडूंच्या जर्सीचा रंग कोण ठरवतं?
कोणत्याही खेळासाठी एक ड्रेस कोड असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना एका रंगाचा पोषाक करूनच खेळाडू मैदानात उतरतात. भारतीय खेळाडू बहुतांश सर्वच खेळांमध्ये निळ्या रंगाची जर्सी परिधान करून उतरतात. पण हॉकी महासंघाने भगव्या रंगाच्या जर्सीला पसंती दिली आहे. जर्सीचा रंग ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी हा त्या त्या खेळाच्या सर्वोच्च संस्थेला असतो. जसं की हॉकी महासंघाने भगव्या जर्सीला पसंती दिली आहे. तसंच क्रिकेट जर्सी कशी असेल हे बीसीसीआय ठरवते. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप वगैरे नसतो. खेळाडू आणि प्रशिक्षक युनिफॉर्म कसा असावा याबाबत भूमिका बजावतात. त्यामुळे सल्लामसलत केल्याशिवाय क्रीडा संस्था थेट निर्णय घेत नाहीत. आराम, कापडाचा दर्जा आणि मैदानावर दिसण्याजोगेपणा यावरून युनिफॉर्म ठरवला जातो.
हॉकी संघाची जर्सी का बदलली?
गेल्या काही वर्षात मैदानांची रचना, आधुनिक टर्फ आणि हायडेफिनेशन प्रसरणामुळे रंगाचा फरक पडतो. फ्लडलाइट्स किंवा कृत्रिम गवताच्या रंगामुळे त्रास होतो. कॅमेरा आणि प्रेक्षकांसाठी दृश्यमानता सुधारण्यासाठी रंगाची निवड करावी लागते. खरं तर जर्सीच्या रंगाबाबत तसे काही नियम नाहीत. प्रत्येक देश आणि संघटना त्याच्या इच्छेनुसार रंग ठरवते. सांस्कृतिक ओळख, इतिहास आणि राष्ट्रीय चिन्हांच्या आधारावर युनिफॉर्म डिझाईन केला जातो. आंतरराष्ट्रीय हॉकी हिरव्या गवताच्या मैदानाऐवजी निळ्या कृत्रिम टर्फवर खेळवली जाते. तेव्हा जर्सीचा आणि मैदानाचा रंग एक होतो. त्यामुळे खेळाडूंना सहकारी चेंडू पास करताना ओळखणं कठीण होतं. त्यामुळेच निळ्या रंगातून भगवा रंग करण्यात आला.
भगव्या जर्सीचं वैशिष्ट्य काय?
हॉकी इंडियाच्या मते, भगवा रंग राष्ट्रध्वजाच्या वरच्या रंगावरून आणि उगवत्या सूर्याचं तेज म्हणून घेतला आहे. तसेच हा रंग शौर्य, त्यात आणि विजयाच्या भावनेचं प्रतीक आहे. जर्सीच्या छातीच्या भागावर सुदर्शन चक्राचे आधुनिक चित्रण आहे. संघाची ताकद, गतिशीलता, शिस्त आणि अढळ एकतेचे प्रतीक मानलं जाते. कॉलरवर गडद निळ्या रंगाचे पट्टे असून अशोक चक्रापासून प्रेरित आहे. तर खांद्यावर राष्ट्रध्वजाच्या तीन रंगाच्या पट्ट्या आहेत.