FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप कोण जिंकणार? क्लेमेंट यांनी वर्तवलं भाकीत! यापूर्वी तीनदा असंच घडलं
Winner Prediction for FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असं असताना त्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहिल्यांदा 48 संघ मैदानात उतरणार आहे. पण त्यापूर्वीच विजेत्या संघाचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी होणार आहे. मात्र अंतिम फेरीत कोण पोहोचणार? आणि कोणते संघ भिडणार? याच भाकीत स्पर्धा सुरू होण्यापू्र्वीच वर्तवण्यात आलं आहे. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या पर्वात नेदरलँड जेतेपदाची पताका उंचावेल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. जर्मन इकोनॉमिस्ट जोकिम क्लेमेंट यांनी हे भाकीत वर्तवलं आहे. त्यांनी भाकीत वर्तवल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. कारण आतापर्यंत त्यांनी वर्तवलेली सर्व भाकीतं खरी ठरली आहे. त्यामुळे त्यांच्या भाकीतावर काही जणांचा विश्वास आहे. जोकिम क्लेमेंट यांनी 12 वर्षापूर्वी मस्करीत फुटबॉल वर्ल्डकप विजेत्याचं भाकीत वर्तवण्यास सुरूवात केली होती. पण त्यांचं भाकीत खरं ठरल्याने विश्वास वाढला आहे. मागच्या 12 वर्षात जोकिम क्लेमेंट यांनी तीन फिफा वर्ल्डकप स्पर्धेबाबत भाकीत वर्तवलं आणि ते खरंही ठरलं.
नेदरलँडला जेतेपदासाठी पसंती
जोकिम क्लेमेंट यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा भाकीत वर्तवलं होतं. तेव्हा त्यांनी जर्मनीच्या बाजूने कौल दिला होता आणि झालंही तसंच.. जर्मनीने त्या वर्षी जेतेपद पटकावलं. त्यानंतर 2018मध्ये फीफा वर्ल्डकप स्पर्धेत फ्रान्स जिंकणार असं सांगितलं. आश्चर्याची बाब म्हणजे त्या वर्षी फ्रान्सने जेतेपदाला गवसणी घातली. 2022 मध्ये कतरमध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धा पार पडली. तेव्हा जोकिम यांनी अर्जेंटिनाला पसंती दिली होती. त्या स्पर्धेचा निकालही त्याच्या भाकीताप्रमाणे लागला. त्यामुळे त्यांनी आता नेदरलँडच्या बाजूने कौल दिल्याने असंच घडू शकते असं अनेकांना वाटत आहे. विशेष म्हणजे विजेत्याचं भाकीत वर्तवताना त्यांनी संगणकीय मॉडेलचा वापर केला आहे. यासाठी त्यांनी पूर्ण आराखडाच मांडला आहे.
उपांत्यपूर्व फेरीत कोण खेळणार?
जर्मन अर्थशास्त्रज्ञ जोकिम क्लेमेंट यांनी संगणकीय मॉडेलनुसार, उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणाऱ्या आठ संघांचं भाकीत वर्तवलं आहे. नेदरलँड, फ्रान्स, बेल्जियम, स्पेन, पोर्तुगाल, जापान, इंग्लंड आणि अर्जेंटिना हे संघ उपांत्यफेरी गाठतली.
- नेदरलँड्स विरुद्ध फ्रान्स
- स्पेन विरुद्ध बेल्जियम
- इंग्लंड विरुद्ध जपान
- पोर्तुगाल विरुद्ध अर्जेंटिना
उपांत्य फेरीत कोणाचा सामना होईल?
जोकिम क्लेमेंट यांनी उपांत्य फेरीसाठी नेदरलँड, इंग्लंड, पोर्तुगाल आणि स्पेन या संघांना पसंती दिली आहे.
- नेदरलँड्स विरुद्ध स्पेन
- इंग्लंड विरुद्ध पोर्तुगाल
अंतिम फेरीत नेदरलँडचा सामना कोणाशी?
अंतिम सामन्यात नेदरलँड आणि पोर्तुगाल हे संघ आमनेसामने येतील. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची पसंती पोर्तुगालला असेल. पण जोकिम यांनी नेदरलँडला पसंती दिली आहे. त्यांच्या भाकीतानुसार, नेदरलँड पहिल्यांदाच जेतेपद मिळवेल. आता त्यांचं भाकीत चौथ्यांदा खरं ठरतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं.