पाकिस्तानी क्रिकेटर vs पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड, वाद चिघळला, आता थेट कोर्टात घेतली धाव

Pakistan Cricket News: पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही ना काही वाद सुरु असतोच आता हे काही नवीन नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान इमाम-उल-हकला दुखापत झाली होती. आता यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

पाकिस्तानी क्रिकेटर vs पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड, वाद चिघळला, आता थेट कोर्टात घेतली धाव
| Updated on: Sep 02, 2026 | 10:32 AM

पाकिस्तान क्रिकेटमध्ये काही ना काही वाद सुरु असतोच आता हे काही नवीन नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान इमाम-उल-हकला दुखापत झाली होती. पीसीबीने एक निवेदन जारी करून सांगितले होते की, क्षेत्ररक्षण करताना त्याच्या पोटरीला गंभीर दुखापत झाली आहे आणि तंदुरुस्ती परत मिळवण्यासाठी त्याला १० दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर, इमाम पायाला पट्टी बांधून सराव करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओनंतर, स्टुअर्ट ब्रॉडसह अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ञांनी दावा केला की इमामने दुखापतीचे नाटक केले होते.

इमाम-उल-हक अडचणीत
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सूत्राने सांगितले की इमाम-उल-हक गंभीर अडचणीत असल्याचे दिसत आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याला वकीलही नेमावा लागू शकतो. सूत्रांनी सांगितले, “इमाम गंभीर अडचणीत आहे. जेव्हा तो बोर्डाच्या चौकशी समितीसमोर हजर होईल, तेव्हा त्याला वकिलाची गरज लागेल. ही समिती त्याच्या पोटरीच्या स्नायूच्या दुखापतीची चौकशी करेल, ज्यामुळे तो दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये फलंदाजी करू शकला नाही.”

पाकिस्तानचे माजी निवडकर्ता मोहम्मद वसीम यांनी खुलासा केला की, २०२२ च्या इंग्लंड मालिकेदरम्यान इमाम-उल-हकच्या दुखापतींमध्ये दिसून आलेल्या एका विशिष्ट पद्धतीबद्दल फिजिओथेरपिस्ट क्लिफ डीकन यांनी चिंता व्यक्त केली होती. यामुळे इमाम-उल-हकच्या अडचणी वाढत असल्याचे दिसते.

२०२५ मध्ये, एका मीडिया रिपोर्टनुसार पीसीबीने स्थापन केलेल्या एका समितीला असे आढळून आले की, इमाम-उल-हकने न्यूझीलंड मालिकेदरम्यान अंगठ्याच्या दुखापतीचे नाटक केले होते. हे प्रकरण इतके गंभीर होते की समितीने इमामवर सर्व फॉरमॅटमधून बंदी घालण्याचाही विचार केला होता.

पाकिस्तानला परत पाठवले
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. आता तिसरा आणि अंतिम कसोटी सामना ९ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. त्यापूर्वी, पाकिस्तानी संघाने सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवले आहे. केवळ खेळाडूच नव्हे, तर सरफराज अहमद आणि उमर गुल या दोन प्रशिक्षकांनाही बडतर्फ करण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us