Shubman Gill: आता शुभमन ठरवणार विराटने कसं खेळायचं? मॅच जिंकल्यानंतर गिल जे म्हणाला ते तुम्हालाही पटणार नाही
IND vs WI ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे मालिका सुरु असून पहिला सामना रंगला जो भारतीय संघाने जिंकला. आता यानंतर कर्णधार शुभमन गिल जे म्हणाला त्याच्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.

Shubman Gill IND vs WI ODI: भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सामन्यानंतर, भारतीय कर्णधार शुभमन गिलने संघाची कामगिरी, खेळाडूंचा फॉर्म आणि भविष्यातील रणनीती यावर सविस्तरपणे भाष्य केले. १०८ चेंडूंमध्ये ११० धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केल्यानंतर, गिलने आपल्या फलंदाजीचे, विराट कोहलीच्या फॉर्मचे आणि कुलदीप यादवच्या सामना फिरवणाऱ्या गोलंदाजीचे कौतुक केले.
स्वतःच्या ११० धावांच्या शतकाबद्दल बोलताना कर्णधार शुभमन गिल म्हणाला, “खरं सांगायचं तर, जेव्हा मी बाद झालो, तेव्हा मला वाटलं की मी सामना पूर्ण करून परत यायला हवं होतं. शेवटपर्यंत क्रीजवर टिकून राहणं अधिक चांगलं ठरलं असतं, पण हो, माझ्यासाठी ही एक खूप समाधानकारक खेळी होती. फ्रंट-फूट ड्राइव्ह हा त्याचा आवडता शॉट होता.”
गिल म्हणाला, “जर कुलदीपसारखा गोलंदाज मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत असेल, तर तो आमचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरतो. त्याने हे वेळोवेळी सिद्ध केले आहे आणि आज पुन्हा तेच केले. वेस्ट इंडिजच्या सलामीच्या भागीदारीने आणि आघाडीच्या फलंदाजांनी आम्हाला बॅकफूटवर ढकलले होते, पण कुलदीपने आम्हाला सामन्यात परत आणले आणि महत्त्वपूर्ण बळी घेतले. एका क्षणी असे वाटत होते की ते ३४०-३५० धावा करतील, पण त्यांना ३०० धावांवर रोखणे हा आमच्या संघाचा एक उत्तम प्रयत्न होता.”
विराट कोहलीचे कौतुक
विराट कोहलीच्या आक्रमक शैली आणि निर्बंधमुक्त खेळाबद्दल गिल म्हणाला, “विराट उत्कृष्ट फलंदाजी करत आहे आणि मला वाटते की तो खेळाचा आनंद घेत आहे. तो पूर्ण स्वातंत्र्याने खेळत आहे आणि हे त्याच्या फलंदाजीत स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याच्यामध्ये चौकार मारण्याची क्षमता नेहमीच होती आणि आता तो पूर्ण ताकदीने तसे करत आहे.”
कर्णधार म्हणून विराटला त्याच्या पद्धतीने खेळण्याचे स्वातंत्र्य देता का, असे विचारले असता गिल हसून म्हणाले, “त्याच्यासारख्या खेळाडूंना, ज्यांनी देशासाठी अगणित सामने जिंकले आहेत आणि तेही वेळोवेळी, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे असते. जेव्हा ते चांगल्या फॉर्ममध्ये असतात, तेव्हा ते स्वतःच्या बळावर सामने जिंकू शकतात.” याच्या अर्थ शुभमन गिल विराटला स्वातंत्र्य देतो आणि म्हणून विराट असा बिनधास्त खेळतोय असा होत आहे.