Sunil Gavaskar : बोलणं खूप सोपं आणि स्वस्त, पण..IPL संपताच गावस्करांकडून अशा फ्रेंचायजींचा कठोर शब्दात समाचार
Sunil Gavaskar : सुनील गावस्कर हे परखडपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. आयपीएल संपल्यानंतर त्यांनी आपल्या शैलीत काही फ्रेंचायजीना खडेबोल सुनावले आहेत. त्याचवेळी RCB चे कोच अँडी फ्लावर यांचं भरभरुन कौतुक सुद्धा केलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. अँडी फ्लावर या टीमचे कोच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरुने ही कामगिरी केली. यंदाच्या सीजनमधील विजयाचं श्रेय विराट कोहली, भुवनेश्वर कुमार आणि क्रुणाल पांड्या सारख्या दिग्गजांना सुद्धा जातं. टीमच्या सपोर्ट स्टाफने पडद्यामागे राहून कमाल केली. फ्लावर याचा प्रवास पाहिला तर ते 2020 आणि 2021 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे सहाय्यक कोच होते. त्यानंतर ते लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य कोच बनले. ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी RCB जॉइंन केली. त्यांच्यावर मुख्य कोचची जबाबदारी सोपवण्यात आली.
फ्लावर यांच्या मार्गदर्शनाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम यशाचा नवीन अध्याय लिहित आहे. त्याचवेळी जुनी टीम लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा सीजन खूप खराब ठरला. पॉइंट्स टेबलमध्ये ही टीम तळाला आहे. या खराब प्रदर्शनानंतर ऋषभ पंतने टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कोचिंग स्टाफच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. गावस्कर यांच्या म्हणण्यांनुसार, पुढच्या काही दिवसात आणखी काही टीमच्या नेतृत्वात बदल दिसू शकतो.
सुनील गावस्कर यांनी आपल्या कॉलममध्ये काय म्हटलय?
“ऋषभ पंतचा लखनऊ टीमचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय हा पुढच्या सीजनसाठी कॅप्टनशिपमध्ये पहिला बदल आहे. पुढच्यावर्षी नवीन सीजन सुरु होण्याआधी आणखी काही बदल दिसू शकतात. माझ्या कानात बरेच आवाज यायचे. वेगवेगळे विचार यायचे. निश्चितच सपोर्ट स्टाफसाठी ही चांगली गोष्ट नाही. आता पुढच्या सीजनमध्ये फ्रेंचायजीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात की नाही हे लवकरच समजेल ” असं सुनील गावस्कर यांनी Sportstar वर लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटलं आहे.
अशा लोकांना चुकीची शिक्षा मिळते
“बोलणं खूप सोपं आणि स्वस्त आहे. काही कोचेस मोठमोठे दावे करतात. त्याची चर्चा होते. पण क्रिकेटची आपली पद्धत आहे. हा खेळ अशा लोकांना आपल्या चुकांची शिक्षा देतो”
शांतपणे काम करणाऱ्या माणसाचं हे उत्तम उदहारण
त्यांनी RCB चे कोच अँडी फ्लावर यांचं उदहारण दिलं. “ते एक असे व्यक्ती आहेत, जे गपचूप, शांतपणे आपलं काम करतात. त्यांच्या टीमने सलग दोन किताब जिंकले आहेत. शांतपणे काम करणाऱ्या माणसाचं हे उत्तम उदहारण आहे. चर्चेत राहण्यासाठी ते मोठमोठी वक्तव्य करत नाहीत. सपोर्ट स्टाफमध्ये गोल्फ खेळणारे, बिअर पिणारे कोणी त्यांचे मित्र नाहीत. कदाचित यातच मोठा धडा आहे. जे लोक कोचना नियुक्त करतात ते यातून शिकले असते तर. टुर्नामेंटचा पहिला महिना संपण्याआधी त्यांची टीम शर्यतीतून बाहेर पडली नसती” असं मत गावस्कर यांनी नोंदवलं आहे.