डोळे बंद करून तर कोथिंबीरही घेत नाही, मग सेकंड हँड फोन का घेताय?; या 5 गोष्टींची खात्री करा मगच करा व्यवहार पूर्ण

| Updated on: Mar 23, 2023 | 9:49 AM

जर तुम्ही सेकंड हँड मोबाईल विकत घ्यायचा विचार करत असाल तर जुना डिव्हाईस नीट तपासून काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. यामुळे तुम्हाला कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करता येईल.

डोळे बंद करून तर कोथिंबीरही घेत नाही, मग सेकंड हँड फोन का घेताय?; या 5 गोष्टींची खात्री करा मगच करा व्यवहार पूर्ण
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : सध्याच्या युगात स्मार्टफोन (smartphone) हे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे. आयुष्यातील सगळे व्यवहार आजाकाल मोबाईलद्वारे पूर्ण केले जातात, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल (mobile) हा दिसतोच. सध्या बाजारात एकापेक्षा एक मस्त स्मार्टफोन आले आहेत, पण चांगला स्मार्टफोन घेण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. अशा परिस्थितीत बरेच युजर्स हे स्वस्त फोन किंवा सेकंड हँड मोबाईल (second hand phone) खरेदी करतात. सध्या सेकंड हँड मोबाईलची बाजारपेठही खूप मोठी झाली आहे.

अनेक लोकं जुना फोन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी खरेदी करू शकतात. सामान्यत: चांगले फीचर्स असलेले सेकंड हँड मोबाईल कमी किमतीत मिळतात, पण ते घेण्यामध्ये मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत सेकंड हँड फोन खरेदी करताना सावध राहण्याची गरज आहे. जुना फोन घेण्याआधी काही गोष्टी नीट तपासणे गरजेचे आहे, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. जुना फोन घेताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात व काय काळजी घ्यावी ते जाणून घेऊया.

बिल आणि ॲक्सेसरीज

हे सुद्धा वाचा

सेकंड हँड फोन खरेदी करताना लक्षात ठेवण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोनचे बिल जरूर मागावे. यामुळे फोनची पडताळणी अथवा व्हेरिफिकेशन करणे सोपे होते. फोनच्या सध्याच्या बिलाशी IMEI नंबर जुळवून पहावा. IMEI नंबर तपासण्यासाठी फोनमध्ये *#06# डायल करा आणि नंबर समोरच्या स्क्रीनवर दिसेल. जर फोन विक्रेत्याने फोनचे बिल कुठेतरी हरवले आहे असे सांगितले तर त्याच्याकडून लेखी स्वरूपात घ्यावे. तसेच चार्जर, हेडफोन्स अशा ॲक्सेसरीजही नीट आहेत की नाही, तेही तपासून घ्या.

 विक्रेत्याशी समोरासमोर बोलून घ्या

जर तुम्ही वेबसाइटद्वारे सेकंड हँड फोन विकत घेत असाल, तर फोन विकणार्‍या व्यक्तीची भेट घेणे अथवा त्याच्याशी बोलणे आवश्यक आहे. समोरासमोर बसून फोनसंदर्भातील डील करण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला वाव फारच कमी राहतो.

फोन नीट वापरून बघा

सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताना फोन एकदा नीट वापरून बघा. तुमची खात्री पटली कमी मगच पुढचा व्यवहार करा. किमान 15 मिनिटे तरी फोन योग्य प्रकारे वापरा. याच्या मदतीने तुम्हाला फोनचा परफॉर्मन्स, बॅटरीची क्षमता आणि फोन व्यवस्थित चालतो की नाही हे कळेल.

फोनचे पार्ट्स चेक करा

तसेच सेकंड हँड मोबाईल फोन खरेदी करताना त्याचे पोर्ट्स नक्कीच तपासा. जेणेकरून नंतर कोणताही भाग खराब झाला तर त्रास होणार नाही. फक्त त्याचा लुक पाहून सेकंड हँड फोन विकत घेऊ नका.

टचस्क्रीनही तपासून घ्यावी

सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करताना फोनची टचस्क्रीन काम करत आहे की नाही हे नीट तपासा. नवीन दिसणार्‍या डिव्हाईसची टचस्क्रीनही सदोष असण्याची शक्यता आहे. स्क्रीनच्या प्रत्येक भागावर तुमचे बोट स्वाइप करण्याचा प्रयत्न करा, कीबोर्ड उघडा आणि सर्व कीज दाबून पाहा. यामुळे तुम्हाला टचस्क्रीनची चाचणी घेण्यात मदत होईल.