44 व्या मजल्यावर काच पुसणारा व्यक्ती, मृत्यूची भीती वाटते का? विचारताच दिलं थेट उत्तर, ऐकून तुम्ही देखील…
सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण अशातच आता एका 44 व्या मजल्यावर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मजुराचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्याचा पगार किती?

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी माणूस किती कठीण परिस्थितीत काम करू शकतो याचा प्रत्यय तेलंगणातील नानकरामगुडा येथील एका व्हायरल व्हिडिओतून समोर आला आहे. तब्बल 44 व्या मजल्यावर दोरीच्या आधाराने हवेत लटकून इमारतीच्या काचा आणि बाल्कनी स्वच्छ करणाऱ्या मजुराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. त्याच्या धाडसाचे कौतुक करतानाच अनेकांनी त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ निर्भय शर्मा नावाच्या व्यक्तीने चित्रित केल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये दोन मजूर उंच इमारतीच्या 44 व्या मजल्यावरील बाल्कनीबाहेर लटकून स्वच्छतेचे काम करताना दिसतात. त्यापैकी एका मजुराने आपण मूळचे झारखंडचे रहिवासी असून, तेलंगणात उंच इमारतींच्या काचा आणि बाल्कनी स्वच्छ करण्याचे काम करत असल्याचे सांगितले.
महिन्याला 25 हजार रुपये पगार
या धोकादायक कामासाठी संबंधित मजुराला महिन्याला सुमारे 25 हजार रुपये मिळतात. याशिवाय कंपनीकडून तांदूळ, स्वयंपाकाचा गॅस आणि प्रवासासाठी भत्ताही दिला जात असल्याचे त्याने सांगितले. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी तो गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करत आहे.
इतक्या उंचीवर काम करताना भीती वाटत नाही का, असा प्रश्न विचारला असता मजुराने सहजपणे उत्तर दिले, ‘पाच-सहा वर्षांपासून हे काम करत आहे, त्यामुळे आता भीती वाटत नाही’. त्याच्या या उत्तराने अनेकांना भावुक केले. ज्या ठिकाणी छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते, तिथे हा मजूर रोजीरोटीसाठी जीव धोक्यात घालून काम करत आहे.
सोशल मीडियावर सुरक्षेची चिंता
या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत मजुरांच्या मेहनतीला सलाम केला आहे. काहींनी त्यांना सावधगिरीने काम करण्याचा सल्ला दिला तर काहींनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मजूर किती कठीण परिस्थितीत काम करतात हे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून पुन्हा समोर आले आहे.
दरम्यान, अशा उंचीवरील कामांमध्ये योग्य सुरक्षा उपकरणे, प्रशिक्षित कर्मचारी आणि आवश्यक सुरक्षा उपाय अत्यंत महत्त्वाचे असतात. मजुरांच्या जिद्दीइतकीच त्यांच्या जीवाची आणि सुरक्षिततेची काळजी घेणेही गरजेचे आहे.