‘एनपीएस’ला कर्मचाऱ्यांची पसंती; वर्षभरात खातेदारांची संख्या 22 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या योजनेचे फायदे

| Updated on: Dec 19, 2021 | 6:45 AM

राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हा निवृत्ती नंतरच्या सुरक्षीत भविष्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढ असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत या योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांच्या संख्येत 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

एनपीएसला कर्मचाऱ्यांची पसंती; वर्षभरात खातेदारांची संख्या 22 टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या योजनेचे फायदे
Follow us on

नवी दिल्ली :  राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हा निवृत्ती नंतरच्या सुरक्षीत भविष्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. या योजनेमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढ असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत या योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांच्या संख्येत 22 टक्क्यांनी वाढ झाली असून, योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 4.75 कोटींवर पोहोचली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये हीच संख्या 388.62 लाख एवढी होती. एनपीएसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या योजनेतील एकूण गुंतवणूक ही 6,87,468  कोटी रुपयांवर पोहचली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची गुंतवणूक वाढली

दरम्यान या योजनेमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे कर्मचारी देखील मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. उपलब्ध आकेडवारीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या गुंतवणुकीमध्ये 4.71 टक्के तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या  गुंतवणुकीमध्ये 9.74 टक्क्यांची वाढ झाली असून, हा आकडा अनुक्रमे 22.44 लाख आणि 54.44 लाखांवर पोहोचला आहे. तर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गुंतवणुकीमध्ये 23.73 टक्क्यांची वाढ झाली असून, खातेदारांचा आकडा 3.25 कोटींवर पोहोचला आहे.

योजनेचे फायदे

राष्ट्रीय पेन्शन योजनेची लोकप्रियता वाढत असून, अनेक नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. या योजेनेचा लाभ खासगी अथवा, सरकारी अशा कोणत्याही कर्मचाऱ्यांना घेता येतो. पेन्शन नियामक पीएफआरडीएने सप्टेंबरमध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार व्यक्तीला या योजनेमध्ये वयाच्या 18 व्या वर्षानंतर कधीही गुंतवणूक करता येते. तुम्हाला जर मुदतपूर्व पैसे काढायचे असल्यास तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा असलेल्या एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम मिळते. तर उर्वरीत रक्कम ही तुम्हाला वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन स्वरुपात दिली जाते. दरम्यान या योजनेत जर तुम्ही पाच लाखांपर्यंत रक्कम गुंतवलेली असेल तर वयाचे साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमची सर्व रक्कम खात्यातून काढून घेऊ शकतात. मात्र रक्कम जर 5 लाखांपेक्षा अधिक असेल तर त्यातील 60 टक्के रक्कम ही तुम्हाला काढता येते आणि उर्वरीत 40 टक्के रक्कम ही पेन्शन स्वरुपात दिली जाते.

संबंधित बातम्या

वीजबिल सबसीडी योजनेला शेतकऱ्यांचा विरोध, केंद्राकडून प्रस्ताव मागे

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुंतवणुकदारांना साद, तरुण उद्योजकांच्या व्यवसायात गुंतवणूक करणा-या गुंतवणुकदारांशी पंतप्रधानांची चर्चा…

CNG, PNG च्या दरात पुन्हा वाढ; ग्राहकांना मोठा आर्थिक फटका, वर्षभरात 16 वेळेस वाढले भाव