वनहक्क पट्ट्यांच्या जमिनींच्या सातबाऱ्यावर ‘सरकार’ असा उल्लेख, शेतकऱ्यांना धान्य व्यापाऱ्यांना कमी भावात विकण्याची वेळ

वनहक्क पट्टे मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सरकार हा उल्लेख असल्याने धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान्य खरेदी होत नाही. (Gondia Dhan Farmers issue)

  • शाहिद पठाण, टीव्ही 9 मराठी, गोंदिया
  • Published On - 12:45 PM, 2 Dec 2020
Gondia Dhan Farmers issue

गोंदिया: जिल्ह्यातील वनहक्क पट्टे मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सरकार हा उल्लेख असल्याने धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान्य खरेदी होत नाही. शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीने सातबारा नोंदणी केल्यावर धान्य खरेदी केली जात आहे. पण, ज्या शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले आहेत, त्यांच्या सातबारावर सरकार असा उल्लेख असल्याने त्यांचे धान्य खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नाही. वनहक्क पट्टे मिळालेल्या शेतकऱ्यांना धान्य कुठे विकावे असा प्रश्न पडला आहे. (Gondia Dhan Farmers issue)

दरवर्षी ऑफलाईन पध्द्तीने धान्य खरेदी केली जात होती. अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आली होती, गरजू शेतकऱ्यांची धान्य खरेदी केंद्रावर खरेदी करण्याऐवजी व्यापाऱ्यांची धान्य खरेदी केली जाते,अशा तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने या वर्षी ऑनलाईन सातबारा काढून त्याची नोंदणी करुन धान्य खरेदी करण्याची पद्धत स्वीकारली. ज्या खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे, अशा केंद्रावरून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज पाठवून शेतकऱ्यांचा धान्याचे वजन होणार असल्याचे कळविण्यात येत आहे. मात्र, या ऑनलाईन पद्धतीचा फटका वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना बसला आहे. (Gondia Dhan Farmers issue)

गोंदिया जिल्हा हा आदिवासीबहूल भाग असून या जिल्ह्यात वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. वनाशेजारी अनेक गावे वसली आहेत, अशा गावातील शेतकऱ्यांना रोजगाराचे साधन नसल्याने नाईलाजाने गावाशेजारी असलेल्या वन जमिनीवर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यावर वन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. ही प्रकरणं पिढ्यानपिढ्या सुरु राहिली. अखेर या शेतकऱ्यांना वनपट्टे देण्यात आले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना वनपट्टे मिळाले असले तरी त्याच्या सातबारावर सरकार असा उल्लेख असल्याने त्यांच्या शेतात पिकविलेले धान्य खरेदी केंद्रावर खरेदी केल जात नाही. (Gondia Dhan Farmers issue)

व्यापाऱ्यांना कमी दरानं धान्य विकण्याची वेळ

शासकीय खरेदी केंद्रावर धान्य खरेदी होत नसल्यानं आता व्यापाऱ्याला धान्य विकण्याची वेळ या आल्याचं रामचंद तप्पडवाडे यांनी सांगितले. शेतात राबराब राबून पिकविलेल्या धान्याला भाव मिळणार नसल्याने चिंता वाढली असल्याचे कवडू भोयर यांनी सांगतिले.

सरकारने यावर्षी धान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना धान्य विकायचे असेल तर ऑनलाईन सातबारा काढून नोंदणी करावी लागेल, असा नियम लागू केला. सातबाऱ्यावर सरकार असा उल्लेख असणाऱ्या शेतकऱ्यांची धान्य खरेदी केली जात नाही. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. ही बाब वरिष्ठ स्तरावर लक्षात आणून दिली असून लवकरच यावर तोडगा निघेल असेही त्यांनी सांगितले आहे, असं आदिवासी विकास महामंडळ धान्य खरेदी केंद्र सचिव सुनील अवरासे यांनी सांगितले. (Gondia Dhan Farmers issue)

ऑनलाईन नोंदणी पद्धतीनमुळे शेतकऱ्यांना फायदा जरी होत असला तरी मात्र सातबारावर सरकार उल्लेख असलेल्या शेतकऱ्यांना याचा मनस्ताफा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पर्याय उरला उरला नसल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात धान्य विकावे लागत आहे, त्यामुळे शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

संबंधित बातम्या : 

गोंदियात वाघाची शिकार करून अवयव शेतशिवारात फेकले; पंजे आणि डोकं गायब

गोंदियात अखेर 38 दिवस उशिरानं शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांना दिलासा

(Gondia Dhan Farmers issue)