कांदा प्रश्नावरून शेतकरी संघटना रस्त्यावर, केलं हटके स्टाईल आंदोलन

शेतकरी संघटनेने केलेल्या या आंदोलनात मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

कांदा प्रश्नावरून शेतकरी संघटना रस्त्यावर, केलं हटके स्टाईल आंदोलन
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 29, 2022 | 3:19 PM

मनोहर शेवाळे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : कांद्याची पंढरी (Onion) म्हणून ओळख असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) चिंतेत सापडला आहे. सातत्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण आणि केंद्राच्या निर्यात विषयक धरसोडीच्या धोरणावरून शेतकरी संकटात सापडला आहे. याच मुद्द्यावरून शेतकरी वर्गात मोठी नाराजी पसरली असून कांद्याच्या दराबाबत योग्य धोरण ठरवा अशी मागणी केली जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा धागा पकडत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. ‘कांदा बाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह’ आंदोलनाची हाक देत हटके स्टाईल आंदोलन केले आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांद्याच्या माळा बनवून गळ्यात घालून प्रतिकात्मक तिरडी खांद्यावर घेतली होती.

शेतकरी संघटनेने केलेल्या या आंदोलनात मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्यातील कांद्याचे दर घसरत असल्याने अधिकचे कांद्याचे उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात घेतले जात असून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ नाशिक जिल्ह्यात आहे.

केंद्राच्या निर्यात व्यापार विषयक धरसोडीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायद्या एवजी नेहमी नुकसानीचा सामना करावा लागतो आहे.

सातत्याने कांद्याच्या भावात घसरण आणि मुसळधार पावसाने झालेले नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडला असून मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

याच विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने कांदा प्रश्नावरून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तिरडी आंदोलन केले आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव जवळील टेहरे हुतात्मा चौकात शेतकरी संघटनेतर्फे कांदा बाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह आंदोलन करण्यात आले आहे.