गड, बालेकिल्लेही राखता आले नाहीत… महाविकास आघाडीचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव; नाशिकमध्ये 11 पैकी…
Nashik Election Results 2025 : नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. 11 पैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आलेला नाही. या सर्व 11 जागांवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. या निकालात महायुतीची सरशी पहायला मिळत आहे. महायुतीने आतापर्यंत 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. 11 पैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आलेला नाही. या सर्व 11 जागांवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महाविकास आघाडीचा पराभव
नाशिक जिल्ह्यातील 11 पैकी 11 जागांचा निकाल हाती आला आहे. एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 11 पैकी 5 जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी असून या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी 3 नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. 11 पैकी एकही नगराध्यक्ष पदाची जागा महाविकास आघाडीला जिंकता आलेली नाही.
चांदवड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा
चांदवड नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपच्या वैभव बागुल विजयी झाले आहेत. येथे भाजपचे 11 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर शिवसेनेने दोन जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक, शिवसेना ठाकरे गटाचा 1 आणि 5 अपक्ष नगरसेवक विजयी झाले आहेत.
आमदार सुहास कांदे यांनी नांदगावचा गड राखला
आमदार सुहास कांदेंनी नांदगावमध्ये आपली सत्ता राखला आहे. येथे शिवसेनेचे सागर हिरे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपनेही एक जागा जिंकली आहे. येथेही महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे.
नाशिक जिल्हा 11 नगर परिषद निकाल
- भगूर – अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे विजयी
- येवला – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र लोणारी विजयी
- सिन्नर – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विट्ठलराजे उगले विजयी
- नांदगाव – शिवसेनेचे सागर हिरे विजयी
- इगतपुरी – शिवसेनेच्या शालिनी खातळे विजयी
- सटाणा – शिवसेनेच्या हर्षदा पाटील विजयी
- त्र्यंबकेश्वर – शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार विजयी
- मनमाड – शिवसेनेचे योगेश पाटील विजयी
- चांदवड – भाजपचे वैभव बागुल विजयी
- पिंपळगाव बसवंत – भाजपचे डॉ. मनोज बर्डे विजयी
- ओझर – भाजपच्या अनिता घेगडमल विजयी
कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष ?
- एकूण नगराध्यक्षपदं – 11
- भाजप – 3
- शिवसेना – 5
- राष्ट्रवादी – 3
- काँग्रेस – 0
- शिवसेना ठाकरे गट – 0
- राष्ट्रवादी शरद पवार – 0
