Car Test : 145 च्या स्पीडला कारचे चारही टायर फुटले, पण तरीही कारला काही झालं नाही, स्वत: कंपनीचे प्रेसिडेंट चालवत होते कार
Car Test : कार वेगात पळत असताना अचानक कारचे टायर फुटले तर चालकाचं नियंत्रण सुटतं. कार दिशाहीन होते. अनेकदा अशावेळी भीषण अपघात घडतो. पण एक कार चक्क 145 च्या स्पीडला पळत असताना चारही टायर फुटले पण कारला काही झालं नाही.

समजा तुम्ही हायवे वर 145 च्या स्पीडने कार चालवताय आणि अचानक एकाचवेळी चार टायर फुटले तर? अशा स्थितीत कारचं संतुलन बिघडू शकतं आणि मोठी दुर्घटना होऊ शकते. पण चीन मध्ये एका इलेक्ट्रिक कार कंपनीने जे केलय, त्यामुळे ऑटोमोबाइल इंडस्ट्री थक्क झाली आहे. चांगनचा प्रीमियम इलेक्ट्रिक कार ब्रांड Avatr ने आपल्या नवीन 06T इलेक्ट्रिक वॅगनची टेस्ट केली. कार वेगात पळत असताना चारही टायरची हवा काढली. आश्चर्याची बाब म्हणजे असं केल्यानंतर कारची दिशा भरकटली नाही किंवा संतुलन ही बिघडलं नाही. सामान्यत: असं घडतं तेव्हा कारचं नियंत्रण सुटतं. महत्वाचं म्हणजे या खतरनाक टेस्ट दरम्यान कंपनीचे प्रेसिडेंट योंग जुन स्वत: ड्रायविंग सीटवर बसलेले. कंपनीने या संपूर्ण टेस्टचं लाइव्ह प्रसारण पाहिलं.
Avatr च्या 06T वॅगनची ही खास टेस्ट चीनच्या चोंगकिंग येथील डियानजियांग प्रोविंग ग्राउंडमध्ये करण्यात आली. लाइव्ह टेस्ट दरम्यान कारचा स्पीड सर्वात आधी 145किमी/प्रतितासच्या वेगापर्यंत पोहोचला. त्यानंतर एकाचवेळी कारचे चारही टायर पंचर करण्यात आले. कारच्या चाकांमधून वेगाने हवा निघून गेली. सामान्यत: अशा स्थितीत कारचं संतुलन बिघडतं आणि ड्रायव्हरकडून कंट्रोल सुटण्याची भिती असते. पण Avatr 06T आपल्या दिशेमध्ये पुढे गेली आणि हळू-हळू थांबली.
लाइव्ह टेस्ट मध्ये इतक्या स्पीडला चाचणी घेतली नाही
कंपनी अधिकाऱ्यांनुसार ‘टाईहॅग इंटेलिजेंट कंट्रोल 2.0’ टेक्नोलॉजीमुळे हा शानदार परफॉर्मन्स शक्य झाला. ही सिस्टिम कारच्या चार चाकांची ब्रेकिंग फोर्सच्या गरजेनुसार विभागणी करते. त्या शिवाय कारच्या डाव्या आणि उजव्या चाकांमधील टॉर्कचं अंतरही कंट्रोल करते. Avatr 06T ने मागच्या एक्सलला दोन इलेक्ट्रिक मोटर दिल्या. गरजेनुसार टॉर्क एडजस्ट करुन कार स्टेबल ठेवायला मदत होते. या कारचे टायर वेग 220 किमी/प्रतितास असताना फुटले तरी ही कार बॅलन्स राहील असं Avatr चे प्रेसिडेंट योंग जुन म्हणाले. कंपनीने लाइव्ह टेस्ट दरम्यान मात्र इतक्या स्पीडला चाचणी घेतली नाही. त्या ऐवजी कारच्या दुसऱ्या चाचण्या केल्या.
कारची क्रॅश टेस्ट सुद्धा केली
कारची क्रॅश टेस्ट सुद्धा करण्यात आली. 50किमी/प्रतितास वेग असताना 50 टक्के ऑफसेटला समोरुन धडकून टेस्ट करण्यात आली. या टेस्ट मध्ये कारच्या पुढच्या भागाला धडकवण्यात आलं. अपघातामध्ये कार किती मजबूत आहे ते समजावं यासाठी ही टेस्ट करण्यात आली. क्रॅश टेस्टच्यावेळी कंपनीचे प्रेसिडेंट कारच्या आत नव्हते.