कारचे अपघात रोखण्यासाठी सरकारचा नवीन प्लॅन, नवीन कारमध्ये मिळणार खास फीचर्स
सरकारने आता यापुढे कारमध्ये AEBS ब्रेकिंग सिस्टम बसवण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. 2030 पासून सर्व गाड्यांमध्ये AEBS सिस्टम आणि 2032 पर्यंत सर्व M1 गाड्यांमध्ये ही सिस्टमची अंमलबजावणी करण्याची योजना आहे.

रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या सुरक्षेसंदर्भात आता महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कारमध्ये अपघाताचा धोका ओळखून आपोआप ब्रेक लावणारी ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम (AEBS) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. ऑक्टोबर 2032 पर्यंत सर्व M1 श्रेणीतील कारमध्ये ही यंत्रणा लागू करण्याचे नियोजन आहे. सध्या या नियमांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
AEBS ही प्रगत चालक सहाय्यक प्रणाली (ADAS) मधील एक महत्त्वाची सुरक्षा सुविधा आहे. वाहनासमोर टक्कर होण्याचा धोका निर्माण झाल्यास ही यंत्रणा तो ओळखून चालकाला मदत करते आणि आवश्यकतेनुसार आपोआप ब्रेक लावू शकते. त्यामुळे अपघात टाळण्यास किंवा टक्कर झाल्यास नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, ही यंत्रणा प्रत्येक अपघात रोखेलच याची हमी नाही.
टप्प्याटप्प्याने नियम लागू करण्याचा प्रस्ताव
1 ऑक्टोबर 2028: AEBS असलेल्या M1 श्रेणीतील कार आणि N1 श्रेणीतील हलक्या मालवाहू वाहनांसाठी निर्धारित मानकांचे पालन करण्याची तरतूद.
1 ऑक्टोबर 2030: नव्याने सादर होणाऱ्या M1 श्रेणीतील कार मॉडेलमध्ये AEBS अनिवार्य करण्याचा प्रस्ताव.
1 ऑक्टोबर 2032: आधीपासून उत्पादनात असलेल्या M1 श्रेणीतील कार मॉडेलसाठीही हा नियम लागू करण्याचे नियोजन.
स्टीयरिंग आणि लेन सुरक्षेसाठीही नवे निकष
सरकार वाहनांच्या स्टीयरिंग नियंत्रणासाठी आणि लेनमध्ये वाहन स्थिर ठेवणाऱ्या प्रणालींसाठीही नवीन मानके प्रस्तावित करत आहे. 1 ऑक्टोबर 2027 पासून स्टीयरिंगवर लागणाऱ्या जोरासंदर्भातील नियम लागू करण्याचे नियोजन आहे. तसेच, 1 ऑक्टोबर 2029 पासून काही प्रवासी वाहने आणि टॅक्सींसाठी स्टीयरिंग व लेन नियंत्रणाशी संबंधित सुरक्षा सुविधा तसेच चालकाला झोप किंवा लक्ष विचलित झाल्याबाबत इशारा देणारी यंत्रणा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे.
ट्रक आणि बसमध्येही वाढणार सुरक्षा
जड वाहनांच्या सुरक्षेसाठी जानेवारी 2027 पासून नव्या ट्रक आणि बस मॉडेलमध्ये AEBS अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. वाहनाच्या जवळील अंध क्षेत्रातील वस्तूंची माहिती देणारी यंत्रणा, चालकाला झोप येत असल्यास इशारा देणारी सुविधा आणि लेनमधून वाहन बाहेर जात असल्यास अलर्ट देणारी प्रणाली यांचाही विचार सुरू आहे.
याशिवाय, 1 ऑक्टोबर 2027 पासून ट्रकच्या ब्रेकिंग यंत्रणेसाठी नवे निकष आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आहे. ही प्रणाली वाहनावरील नियंत्रण राखण्यास मदत करते.
