Maruti Suzuki : सणांच्या काळात Maruti ने ग्राहकांना दिला झटका, या मॉडल्सच्या किंमती वाढल्या 20000 हजार रुपयापर्यंत
Maruti Suzuki : गणेशोत्सव, नवरात्रौत्सव त्यानंतर दिवाळीचा सण जवळ येत असताना मारुती सुझुकीने ग्राहकांना झटका दिला आहे. मारुतीने वेगवेगळ्या मॉडल्सच्या किंमतीवर तब्बल 20 हजार रुपयापर्यंत वाढ केली आहे.

पुढच्या काही दिवसात तुम्ही जर मारुती सुझुकीची नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने पुन्हा एकदा कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने काही निवडक मॉड्लसच्या किंमतीत 20 हजार रुपयापर्यंत वाढ केली आहे. मे 2026 पासून मारुती सुझुकीने तिसऱ्यांदा किंमती वाढवल्या आहेत. यावेळी कारच्या रेंजची किंमत वाढवलेली नाही. नव्या किंमती सप्टेंबर 2026 पासून लागू होतील. किंमती वाढवण्यामागे, वाढता उत्पादन खर्च आणि महागाई ही दोन मुख्य कारणं असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
कार बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तुंची किंमत सतत वाढत आहे असं मारुती सुझुकीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे. त्या शिवाय महागाई सुद्धा कारण आहे. म्हणून कंपनीने वाढलेल्या उत्पादन खर्चाचा भार ग्राहकांवर टाकला आहे. उत्पादन खर्च कमी व्हावा, यासाठी सतत पावलं उचलत असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. विद्यमान स्थितीत वाढत्या खर्चाचा भार वाहणं कंपनीसाठी शक्य नाहीय. म्हणून निवडक कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. कुठल्या-कुठल्या मॉडल्सची किंमत वाढवणार ते मारुती सुझुकीने स्पष्ट केलेलं नाही. आवडत्या कारची किंमत किती वाढली ते जाणून घेण्यासाठी कंपनीकडून मॉडल वाइज किंमतीची प्रतिक्षा करावी लागेल.
अजून कुठल्या कंपनीने कारच्या किंमती वाढवल्यात?
मारुती सुझुकीने वर्षभरात तिसऱ्यांदा किंमत वाढवली आहे. याआधी कंपनीने मे 2026 मध्ये कारच्या किंमती वाढवल्या होत्या. यापूर्वी सर्व मॉडल्सवर किंमतवाढ लागू झाली होती. यावेळी काही निवडक मॉडल्सच्या किंमती वाढतील. मारुती सुझुकीच्या आधी टाटा मोटर्स आणि हुंडई या कंपन्यांनी कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. या कंपन्यांनी सुद्धा वाढता खर्च आणि सप्लायशी संबंधित आव्हान असल्याचं म्हटलं होतं.
कुठल्या कार्सच्या किंमती वाढणार?
मारुती सुझुकी आपल्या कार्स प्रामुख्याने Arena आणि Nexa डीलरशिपच्या माध्यमातून विकते. Arena रेंज मध्ये S-Presso, Alto K10, Celerio, WagonR, Eeco, Swift, Dzire, Brezza, Ertiga आणि Victoris सारख्या कार्स आहेत. Nexa पोर्टफोलियो मध्ये e VITARA, Invicto, Jimny, XL6, Grand Vitara, FRONX आणि Baleno सारखे मॉडेल्स आहेत. यापैकी कुठल्या कार्सच्या किंमती वाढणार ते कंपनीने स्पष्ट केलेलं नाही.
