BLOG : ‘जजमेंटल’ होऊन ‘पंगा’ घेणं परवडणारं नव्हं…

नेहमीच बेताल वक्तव्यांमुळे सगळ्यांशीच 'पंगा' घेणाऱ्या कंगनाच्या 'बंडखोर' वृत्तीवर आमचे मनोरंजन प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी लिहिलेला खास ब्लॉग..

BLOG : 'जजमेंटल' होऊन 'पंगा' घेणं परवडणारं नव्हं...
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 9:27 PM

मुंबई.. जिथे हजारो युवक-युवती आपल्या डोळ्यात असंख्य स्वप्न साठवून येतात. काही जण जिवाची मुंबईही करायला येतात. मुंबई कधी कुणाला उपाशी राहु देत नाही. सगळ्यांना सामावून घेते. पाऊस येऊ दे, दहशतवादी हल्ला होऊ दे किंवा कुठलंही संकट येऊ दे मुंबई आणि सोबतीला मुंबईकर धैर्यानं संटकांचा सामना करायला पाय रोऊन उभा असतो. पण याच मुंबई आणि मुंबई पोलिसांविरोधात कंगना रनौतनं केलेल्या बेताल वक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय.

तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना रनौत बिनधास्त आणि बंडखोर अभिनेत्री. बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना चॅलेंज देणारी क्वीन. कंगना रनौत आणि वाद हे काही नवं नाही. पण यंदा मात्र मुंबईची तुलना चक्क पाकव्याप्त काश्मिरशी करुन कंगना चुकलीच. कोरोना, विदर्भ पूर, तुंबलेली मुंबई, वाढीव विज बिले, सुशांत प्रकरण या सगळ्यांमुळे कोंडीत सापडलेल्या शिवसेनेला तिच्या या वक्तव्यामुळे हक्काचा मराठी अस्मितेचा मुद्दा मिळाला आणि अख्खी फौज कंगनाविरोधात उभी राहिलीये.

कंगनाचं डोकं ठिकाणावर आहे का? कंगनाचा बोलवता धनी नेमका कोण? बॉलिवूडच्या क्वीनचा तोल सुटत चाललायं? असे अनेक प्रश्न आज सगळ्यांना पडलेत. कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल जे वक्तव्य केलंय त्यालाही क्षमा नाही.

ती नेपोटिझमवर बोलली, सगळ्यांनी तिची पाठ थोपटली.

तिने बॉलिवूडच्या प्रस्थापितांविरोधात लढा पुकारला, सगळे तिच्या पाठीशी उभी राहिले.

आदित्य पांचोली असेल किंवा हृतिक रोशन यांच्यासोबत ताणल्या गेलेल्या प्रेमसंबंधावर ती जाहीरपणे बोलत राहिली, सगळे तिच्या पाठीशी उभे राहिले.

सुशांत प्रकरणात पुन्हा बॉलिवूडमधील प्रस्थापितांवर तिनं तोफ डागली. रणबीर कपूर, रणवीर सिंग, विकी कौशलसारख्या मोठ्या स्टार्सची तर तिनं चक्क रक्ताचे नमुने तपासण्याची मागणी केली, तेव्हाही सगळे तिच्या पाठीशी उभे राहिले.

पण आता अतिरेक झालाय. कंगनानं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त कश्मिरशी केल्यामुळे गदारोळ सुरु झालाय. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करण्याच्या नादात कंगनानं मुंबई आणि मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढल्यामुळे चहुबाजूंनी तिच्यावर टीका होतेय. बॉलिवूड असो वा मराठी सगळेच कलाकार कंगनावर तुटून पडलेत. #आमचीमुंबई, #ILOVEMUMBAI ट्विटरवर ट्रेण्ड होतोय. पण एवढं सगळं रामायण घडत असताना कंगना शांत बसेल ती कंगना कसली? तिनं अजून एक प्रक्षोभक ट्विट करत जणू महाराष्ट्र सरकारला चॅलेंजचं दिलंय. मी 9 तारखेला मुंबईत येतेय, मला रोखून दाखवा. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखा. मुंबईत पोहचण्याची वेळही सांगते असं प्रक्षोभक ट्विट कंगनाने करताच हा वाद जास्तचं चिघळलाये.

खरंतर बॉलिवूडमधला कंगनाचा प्रवास एखाद्या मसाला चित्रपटासारखाच आहे. हिमाचल प्रदेशच्या एका छोट्याशा गावातून मायानगरी मुंबईत असंख्य स्वप्न उराशी बाळगून आलेली कंगना एके दिवशी बॉक्स ऑफिसची क्वीन होईल अशी कल्पना कदाचित तिने स्वत:नेही केली नसावी. पण ती आली… तिनं पाहिलं आणि कुठलाही खान नसताना एकटीच्या जीवावर सिनेमा 100 कोटी क्लबमध्ये सामील करुन दाखवला. आजोबा खासदार, वडील व्यावसायिक, आई शिक्षिका तरीही लहानपणापासून बंडखोर असलेल्या कंगनाने करिअर म्हणून अभिनयाचं क्षेत्र निवडलं आणि वाट धरली मायानगरी मुंबईची.

सौंदर्य रुढार्थाने बॉलिवूडच्या नायिकांच्या व्याख्येत बसत नव्हतं. अनेकांनी तिला केस स्ट्रेटनिंग करण्याचा सल्लाही दिला होता. पण कंगनाने या कुणालाही न जुमानता स्वत:चं वेगळेपण जपलं. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी गँगस्टरमधून कंगनाचं इंडस्ट्रीत पदार्पण झालं आणि पहिल्याच सिनेमात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. बरं नंतरचा तिचा प्रवास सोपा नव्हता. कारण करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आपल्यापेक्षा वयाने दुप्पट मोठ्या असलेल्या आदित्य पांचोलीसोबतच्या तिच्या लव्हअफेअर, आदित्यवर तिनं केलेल्या आरोपांची चांगलीच चर्चा झाली. पण यातून सावरत कंगनानंही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली.

हृतिक रोशन बरोबर काईट्स सिनेमाच्या चित्रीकरणाच्यावेळी कंगनाची जवळीक निर्माण झाली. हृतिकचं लग्न झालयं हे माहित असून सुध्दा तिनं आपलं नातं जगजाहिर केलं. पण सो कॉल्ड समाजाला घाबरुन हृतिक रोशनने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि नंतरचा वाद तर सगळ्यांना माहितीये. बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या घराणेशाहीला कंगनाने वाचा फोडली. मग सगळ्यांनी मिळून कंगना ठार वेडी आहे असं गळा फाडून सांगण्याचा प्रयत्नही केला, पण कंगना तिच्या वक्तव्यांवर ठाम राहिली.

जेव्हा एखादी व्यक्ती समाजातील प्रस्थापित चौकटी मोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती समाजातील नसून कोणीतरी वेगळी आहे असं ठरवलं जातं. तिच्या बंडखोर विचारांमुळे तिला मनोरुग्ण ठरवून तिचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात ती स्त्री असेल तर गोष्टी जास्त गंभीर असतात. कंगनावर फक्त वेडेपणाचाच नाही तर पब्लिसिटी स्टंटचाही आरोप वेळोवेळी होतो. अगदी आताही होतोय, पण कंगना या सगळ्यांना पुरुन उरतेय.

करण जोहरला नेपोटिझम जनक संबोधून तर कंगनाने बॉलिवूडमधील प्रस्थापितांना जणू चपराकचं लगावली. पण कुणालाही भिक न घालता कंगनाने या सगळ्यांना तेवढ्याच ताकदीने उत्तर दिली. म्हणूनच सो कॉल्ड बॉलिवूड कल्चरमध्ये कंगना कधीच रमत नाही.

प्रत्येक वेळीस कंगना योग्य असं तिच्या चाहत्यांना वाटायचं. पण यावेळेस मात्र कंगना खरंच चुकलीये. त्यामुळे राजकारण्यांसह कलाकारही कंगनावर तुटून पडलेत. त्यामुळे कमावलेलं नाव मातीमोल होण्याआधीच कंगनानं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, नाहीतर स्वत:ला ‘मणिकर्णिका’ समजून सगळ्यांशीच ‘जजमेंटल’ होऊन ‘पंगा’ घेणं कंगनाला परवडणार नाही.

Kapil Deshpande write on Bollywood actor Kangana Ranaut

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.