
सोयी-सुविधा नसल्याचे रडगाणे तर प्रत्येक जण म्हणतो. पण ज्यांची इच्छाशक्ती दांडगी असते, ते विपरीत परिस्थिती सुद्धा ध्येय गाठतातच. ‘अलिबाबा’ या चीनमधील ऑनलाईन कंपनीचे मालक जॅक मा हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी इंग्लीश शिकण्यासाठी केलेली मेहनत, घेतलेल्या कष्टायला तोड नाही. इंग्रजी शिकण्यासाठी त्यांनी 9 वर्षांचा संयम ठेवला. तर उमेदीच्या काळात त्यांना 30 हून अधिक कंपन्यांनी नोकरी देण्यास नकार दिला. तरीही हा माणूस डगमगला नाही. न्यूनगंडावर सतत मात करत त्याने अतर्क्य अशा गोष्टी केल्या. त्याने 2,267,797,000,000 रुपयांची कंपनी उभारली. चीनच नाही तर जगभरात त्याच्या नावाचा डंका वाजला.
जॅक मा यांचे पूर्ण नाव मा यून असे होते. पण त्याला इंग्रजी भाषेचे वेड होते. म्हणून त्याने त्याचे नाव जॅक मा असे ठेवले. 10 सप्टेंबर 1964 रोजी चीनमधील हांगझोउ शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे आईवडील संगीत क्षेत्रातील होते. कुटुंबाची परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने कसे तरी शिक्षण मिळवले. इंग्रजी शिक्षणासाठी स्थानिक वाटाड्या, टुरिस्ट गाईड म्हणून काम केले.
अमेरिकेत गिरवला उद्योगाचा धडा
1995 साली तो कसाबसा अमेरिकेत पोहचला. तिथे त्याने पहिल्यांदा इंटरनेट पाहिले. लोक तिथे मोबाईलवरून ऑर्डर देतात हे त्याने पाहिले. तिथे चीनी वस्तू मिळत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. या ऑनलाईन शॉपिंगमध्ये चीनच्या वस्तू नसल्याने आपणच एक ऑनलाईन कंपनी का सुरू करू नये हा विचार त्याच्या मनात चमकला.
तो चीनमध्ये परतला. त्याने मित्रांची मदत घेतली आणि हॅबो ट्रान्सलेशन नावाने कंपनी सुरू केली. पुढे त्याने चायना पेजेस नावाची कंपनी सुरू केली. पण दोन्ही कंपन्या चालल्या नाहीत. त्याच्या पदरात निराशा पडली. पण हार मानेल तो जॅक कसला. त्याने अलिबाबा नावाची ऑनलाईन कंपनी सुरू केली. स्थानिक लघुउद्योजकांच्या वस्तू मोठ्या शहरात सहज मिळाव्यात. स्थानिक व्यापाराला चालना मिळावी आणि चाकरमान्यांना स्वस्तात ऑनलाईन शॉपिंग करता यावी अशी त्याची इच्छा होती.
2000 मध्ये जपानमधील सॉफ्टबँकेने अलिबाबा कंपनीला 20 दशलक्ष डॉलरची मदत केली आणि जॅक मा ला तर जणू पंख फुटले. अलिबाबाचे भाग्य एका झटक्यात बदलले. काही दिवसातच ही कंपनी जगभर पसरली. तो चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरला. आज त्याच्या कंपनीत 1,24,320 कर्मचारी आहेत. तर 500 अब्ज डॉलर इतकी भलीमोठी उलाढाल असणारी अलिबाबा ही आशियातील पहिली कंपनी ठरली.
ती चूक महागात
गेल्या काही वर्षात चीनच्या आर्थिक धोरणावर आणि व्यापार नीतीवर जॅक मा खुलेपणाने विरोधात बोलत होते. त्यांनी चीन सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. धोरणांवर टीका केली. सरकारला त्यांची ही भूमिका आवडली नाही. 24 ऑक्टोबर 2020 मध्ये चीनमध्ये एक बैठक झाली. त्यात चॅक यांनी चीनच्या बँकिंग क्षेत्रावर प्रश्न उपस्थित केले. चीनचे राष्ट्रापती शी जिनपिंग हे नाराज झाले. तिथून जॅक यांचे पतन सुरू झाले. ते अचानक गायब झाले. त्यांची कंपनी एंट ग्रुपचा 2.7 लाख कोटींचा IPO थांबवण्यात आला. अलिबाबाची चौकशी सुरू झाली. कंपनीचे बाजार मूल्य 10 लाख कोटींने कमी झाले.