UPI युझर्ससाठी आनंदवार्ता, आता बिनधास्त QR कोड स्कॅन करा, तो धोकाच टळला
UPI New Rules: PhonePe, Google Pay, Paytm सारखे ॲप्स वापरत असाल तर युझर्ससाठी मोठी आनंदवार्ता आली आहे. खासकरून महिलांच्या सुरक्षेचा एक प्रश्न राष्ट्रीय देयके महामंडळाने संपवला आहे. आता कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही व्यवहार करू शकता. तुमचा एक मोठा धोका टळला आहे. काय ती महत्त्वाची अपडेट?

PhonePe, Google Pay, Paytm सारख्या ॲप्सला राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. आतापर्यंत क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर युझर्सचा नंबर दिसत होता. आजकाल सगळीकडे युपीआयचा वापर वाढला आहे. अनोळखी ठिकाणी सुद्धा युपीआयचा वापर करण्यात येतो. तुमचा मोबाईल क्रमांक थेट मिळत असल्याने त्याच्या गैरवापराच्या तक्रारी वाढल्या होत्या. खासकरून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यावर आता एनपीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. युझर्सची सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे.
मोबाईल क्रमांक नाही दिसणार
अनोळखी ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट केल्यावर समोरच्या व्यक्तीला आता तुमचा संपूर्ण मोबाईल क्रमांक दिसणार नाही. विशेष म्हणजे नवीन फीचर्सनुसार पेमेंट प्राप्त करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, नंबर कळणार नाही. पेमेंट झाल्याचा मॅसेज तितका दाखवावा लागेल. डिजिटल डेटा आणि खासगी माहिती समोर येणार नाही यासाठी या कंपन्यांना पाऊल टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वृत्तानुसार, भारतात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा लागू करण्यासाठी NPCI चे वरिष्ठ आणि UPI ॲप्स, बँक अधिकारी यांच्यात चर्चा सुरू आहे. ग्राहकांचा मोबाईल क्रमांक, खासगी माहिती सुरक्षित राहावी. त्याचा कोणीही चुकीचा वापर करू नये यासाठी NPCI काळजी घेत आहे. विशेष म्हणजे पेमेंट ॲप्सला युझर्सचे मोबाईल क्रमांक लपवण्याचे निर्देश अगोदरच देण्यात आलेले आहेत. आता कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पेमेंट केल्यावर युझर्सचा मोबाईल नंबर दिसणार नाही.
शेवटचे 4 नंबर दिसतील
एनपीसीआयने सर्व बँका आणि युपीआय ॲप्सना 4 सप्टेंबर 2026 रोजीपर्यंत नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या नियमानुसार मोबाईल क्रमांक, युपीआय आयडी आणि बँक खात्याची माहिती मास्क लावून, लपवून ठेवली जाणार आहे. पेमेंट प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला, युझर्सच्या मोबाईलचे केवळ अखेरचे 4 क्रमांक दिसतील. महिला युझर्सच्या तक्रारीनंतर सुरक्षा कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा सर्व युझर्सला फायदा होणार आहे. त्यांची माहिती गोपनिय राहील. या नियमाचा पेमेंट पद्धतीवर कोणताही परिणाम होणार नाही.