
केंद्र सरकारने देशभरातील नागरिकांना चांगली बातमी दिली आहे. विकास दराचा डेटा जाहीर झाल्यानंतर देशवासियांना दिलासा सरकारने दिला आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी बेसिक कस्टम ड्यूटीमध्ये 10 टक्के कपात केली आहे. यामुळे खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार आहेत.
केंद्र सरकारने शुक्रवारी एक परिपत्रक काढले. त्यात म्हटले की, खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी कच्या खाद्य तेलावरील बेसिक कस्टम ड्यूटीमध्ये 10 टक्के कपात केली आहे. हा बदल 31 मे पासून लागू असणार आहे. भारत वनस्पती तेलापैकी 70 टक्क्यांपेक्षा जास्त तेल आयात करते. ही आयात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसारख्या देशातून पाम तेलच्या माध्यमातून होते. तसेच अर्जेंटीना, ब्राझील, रशिया आणि यूक्रेनकडून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. सरकारने करात कपात केल्यामुळे आता खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार आहे.
सरकारने कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेल यावरील सीमा शुल्क 20 टक्क्यांवरुन 10% केले आहे. तिन्ही तेलाचे इंपोर्ट शुल्क पूर्वी 27.5 टक्के होते. आता ते 16.5% करण्यात आले आहे. सप्टेंबर 2024 मध्ये भारत सरकारने कच्चे आणि रिफाइंड वनस्पती तेलांवर 20 टक्के सीमा शुल्क लावले होते. तसेच कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावर 27.5 टक्के आयात शुल्क लावले होते. पूर्वी हे शुल्क 5.5 टक्के होते.
मागील एका महिन्यात तेलाच्या किंमतीत चढउतार आले होते. पाम तेल आणि शेंगदाणा तेलाच्या किंमती कमी झाल्या होत्या. तसेच मोहरी तेल, सोयाबीन तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. सूर्यफूल तेलाच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. कंज्यूमर अफेयरच्या आकडेवारीनुसार 30 एप्रिल रोजी शेंगदाणा तेल 190.44 रुपये प्रती किलो होते. 30 मे रोजी शेंगदाणा तेल 188.47 रुपयांवर आले. परंतु मोहरी तेल, वनस्पती तेल आणि सोयाबीन तेलाच्या किंमती क्रमश: 1.64 रुपये, 1.6 रुपये आणि 0.82 रुपये वधारल्या.