
कंगाल पाकिस्तानला आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तानचा सन २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल आला आहे. या अहवालातून पाकिस्तावर कर्जाचा डोंगर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या नऊ महिन्यात पाकिस्तानचे कर्ज प्रचंड वाढले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात पाकिस्तानचे कर्ज ७६ हजार अब्ज पाकिस्तानी रुपयांवर जाऊन पोहचले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर यंदा २.७ टक्के असण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी म्हटले की, मागील दोन वर्षांत पाकिस्तानात आर्थिक सुधारणा घडवून येत आहेत. येत्या आर्थिक वर्षातही ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात सरकारचे कर्ज वाढून ७४ अब्ज डॉलरवर पोहचले आहे. त्यात स्थानिक बँकांकडून ५१ हजार ५०० अब्ज आणि बाह्य स्रोतोंकडून २४ हजार ५०० अब्ज रुपये आहे. सन २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल सरकारचा कामगिरीवर प्रकाश टाकणारा महत्वाचा दस्तावेज आहे. पाकिस्तानात आर्थिक वर्ष १ जून पासून सुरु होत असते.
पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी दावा केला की, पाकिस्तानी अर्थव्यवस्था आता ४११ अब्ज डॉलरवर पोहचली आहे. मागील वर्षी ३७२ अब्ज डॉलर हा आकार होता. पुढील वर्षी २४ सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. ३० जून २०२४ रोजी पाकिस्तानाच विदेशी मुद्रा कोष ९.४ अब्ज डॉलर झाला आहे. २०२३ च्या तुलनेत त्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचे औरंगजेब यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानवर सध्या जे कर्ज आहे, ते जीडीपीच्या ७० टक्के आहे. सन २०२५ मध्ये पाकिस्तानचा जीडीपी ३९० अब्ज डॉलरवर होता. पाकिस्तानचे एकूण कर्ज २६९.३४४ अब्ज डॉलर आहे. पाकिस्तानच्या विद्यामान लोकसंख्येत या कर्जाची विभागणी केली तर प्रत्येक नागरिकावर तीन लाख रुपयांचे कर्ज आहे. म्हणजे पाकिस्तानी नागरिकावर लाखो रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे पाकिस्तान आर्थिक संकटात आहे.