सामान्यांना झळ? कार लोन, होम लोनचा EMI वाढणार? RBI रेपो रेट वाढवण्याची शक्यता, काय होऊ शकतं?
आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यास सामान्यांचा ईएमआय कसा वाढणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जेव्हा रेपो रेट वाढतो तेव्हा बँकांना आरबीआयकडून कर्ज घेणे, पैसे घेणे महाग होते.

RBI Repo Rate : आजकाल अनेक बँका आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज देतात. अनेकजण स्वप्नातलं घर, स्वप्नातली कार खरेदी करण्यासाठी गृहसर्ज, कारलोन घेतात. प्रत्येक महिन्याला EMI च्या रुपात या कर्जाची परतफेड केली जाते. दरम्यान, हे कर्ज फेडणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती लवकरच सामान्यांच्या डोक्यावरील EMI चं ओझं वाढू शकतं, असं सांगत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरुवात झाली आहे. याच बैठकीमुळे लवकरच सामान्यांचा ईएमआय वाढू शकतो, असं बोललं जातंय.
बैठक नेमकी कशामुळे?
आरबीआयच्या पतधोरण समितीची 5 ते 7 ऑक्टोबर या काळात बैठक होत आहे. या बैठकीत रेपो रेटवर सखोल चर्चा केली जाईल. रेपो रेट वाढवायचा की कमी करायचा तेही याच बैठकीत ठरवलं जाईल. बैठक संपताच 7 ऑक्टोबर रोजी रेपो रेटबाबत घेण्यात आलेला निर्णय जाहीर केला जाईल. सध्या या बैठकीला सुरुवात झालेली असून दुसरीकडे बाजारात रेपो रेटमध्ये 25 बेसीस पॉइंट्सने वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. यूनियन बँकेच्या मतानुसार आता रेपो रेट 5.75 टक्क्यांपासून ते 6 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. असे झाले तर सामान्यांना भरावा लागणारा ईएमआय आणखी वाढू शकतो.
रेपो रेट का वाढू शकतो? संभाव्य कारणं काय?
यावेळी रेपो रेट वाढण्याची अनेक संभाव्य कारणं सांगितली जात आहेत. आगामी काळात महागाई वाढू शकते. कच्च्या तेलाचा भाव वाढण्याची भीती अजूनही कायम आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर झालेला आहे. या काही कारणांमुळे आरबीआय रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते, असे सांगितले जातेय.
तुमचा ईएमआय नेमका कसा वाढणार?
दरम्यान, आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यास सामान्यांचा ईएमआय कसा वाढणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जेव्हा रेपो रेट वाढतो तेव्हा बँकांना आरबीआयकडून कर्ज घेणे, पैसे घेणे महाग होते. परिणामी बँकादेखील सामान्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या दरात वाढ करतात. त्यामुळे सामान्यांचा एएमआय वाढतो.
