होणारा नवरा पसंत नव्हता, लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणीने भोसकलं

  • अनिल आकरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा
  • Published On - 11:31 AM, 11 May 2019
होणारा नवरा पसंत नव्हता, लग्नाच्या आदल्या दिवशी तरुणीने भोसकलं

भंडारा : पसंत नसलेल्या मुलासोबत लग्न करावे लागू नये म्हणून होणाऱ्या नवऱ्याची हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे मुलीने आणि तिच्या प्रियकराने मिळून हे क्रूरकृत्य केलं. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील  येरली इथं ही धक्कादायक घटना घडली. विनोद कुंभारे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर रिना मडावी आणि प्रफुल्ल परतेती अशी आरोपींची नावं आहेत.

काय आहे प्रकरण?

तुमसर तालुक्यातील येरली या गावातील विनोद कुंभारेचे लग्न तिरोडा तालुक्यातील कोयलारी या गावातील रिना मडावी या मुलीसोबत ठरले होते. मात्र तिला विनोदसोबत लग्न करायचे नव्हते. तिचे गावातीलच प्रफुल्ल परतेती याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र मुलीच्या वडिलांचा त्यांना विरोध होता. त्यामुळे रिनाच्या वडिलांनी तिचे लग्न विनोदसोबत ठरवलं होतं.

पण हे लग्न रिनाला मान्य नव्हतं. हे लग्न करावे लागू नये म्हणून रिनाने आपल्या प्रियकराचे मदतीने विनोदला गावाबाहेर भेटण्यास बोलाविले.  त्यावेळी दोघांनी मिळून विनोदच्या पोटात चाकू भोसकून त्याची हत्या केली. इतकंच नाही तर त्याचा मृतदेह गावाशेजारील जंगलात फेकला.

एका भावी वधूने आपल्या प्रियकराच्या मदतीने होणाऱ्या नवऱ्याची, लग्नाच्या आदल्या  दिवशीच हत्या केल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली.  प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या कारणाने,या विकृतांनी निर्दोष तरुणाचा खून पाडला.

पोलिसांनी संशयावरुन रिना आणि प्रफुल्लला ताब्यात घेतलं. त्यंना पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी आपला गुन्हा काबुल केला. तुमसर पोलिसांनी 23 वर्षीय रिना मडावी आणि 26 वर्षीय प्रफुल्ल परतेती यांना बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपींचा छडा कसा लागला?

या हत्याकांडाच्या तपासादरम्यान पोलिसांनी मुलीचं गाव कोयलारी गाठलं. यावेळी चौकशी केली असता, गावातील प्रफुल्ल आणि रिनाचं प्रेमप्रकरण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर, त्यांनी गुन्हा कबूल केला.

होणारा नवरा पसंत नव्हता, तसंच प्रेमप्रकरणात अडसर ठरत असल्याने ही हत्या केल्याची कबुली दोन्ही आरोपींनी दिली.