मुलाला ताप येत होता, आई मांत्रिकाकडे घेऊन गेली, मग त्यानंतर जे घडले त्याने सर्वच हादरले !

| Updated on: May 23, 2023 | 10:41 AM

मुलाला बरेच दिवस ताप येत होता. ताप बरा होत नव्हता, त्यामुळे नातेवाईक महिलेने त्याला तांत्रिकाकडे नेण्याचा सल्ला दिला. पण हा सल्ला मुलाच्या जीवावर बेतला.

मुलाला ताप येत होता, आई मांत्रिकाकडे घेऊन गेली, मग त्यानंतर जे घडले त्याने सर्वच हादरले !
मांत्रिकाच्या मारहाणीत 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

सांगली : सांगली जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील 14 वर्षीय शाळकरी मुलगा कर्नाटकातील मांत्रिकाच्या मारहाणीत गंभीर जखमी झाला होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी 20 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य ओळखून आज कवठेमहांकाळ अंनिसचे कार्यकर्ते फारुक गवंडी, सचिन करगणे, दिगंबर कांबळे, भगवान सोनंद यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील त्या कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेतली. त्यांना आधार देऊन मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यास तयार केले. अंनिसच्या प्रयत्नामुळे मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई कवठेमहांकाळ पोलिसांकडून सुरू झाली आहे.

मुलाचा ताप बरा नव्हता म्हणून मांत्रिकाकडे नेले

मुलाला ताप येत होता, तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून मुलाच्या एका नातेवाईक महिलेने तिच्या मांत्रिक वडिलांकडे मुलाला उपचारासाठी नेण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला. त्यानुसार मुलाचे घरचे त्याला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील आप्पासाहेब कांबळे या मांत्रिकाकडे उपचारासाठी घेऊन गेले.

मांत्रिकाने मुलाला भूतबाधा झाल्याचे सांगितले

मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरची बाधा झाली आहे. त्याच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच शनिवारी त्या मुलाचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

मांत्रिकाच्या मारहाणीत जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

मांत्रिकाच्या अमानुष मारहाणीमुळे मुलाचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे या मांत्रिकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे केली. त्यांनी तात्काळ मुलांच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करुन घेत कारवाई सुरू केली आहे. सदर गुन्हा कुडची पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असल्याने, हा गुन्हा कुडची पोलीस स्टेशनला वर्ग करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.