चाकूच्या धाकाने व्यापाऱ्याला लुटलं अन् थेट गोवा गाठलं; पण म्हणतात ना, कानून के हाथ लंबे होते है…

नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन व्यापारी दिवसभराची रोकड घेऊन घरी चालला होता. मात्र वाटेतच त्याला चौघांनी अडवले. मग चाकूचा धाक दाखवून पसार झाले.

चाकूच्या धाकाने व्यापाऱ्याला लुटलं अन् थेट गोवा गाठलं; पण म्हणतात ना, कानून के हाथ लंबे होते है...
उल्हासनगरमध्ये चाकूचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटलं
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 24, 2023 | 7:37 PM

निनाद करमरकर, उल्हासनगर : दुकान बंद करुन घरी चाललेल्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. व्यापाऱ्याला लुटल्यानंतर आरोपी गोव्याला पळून गेले होते. मात्र पोलिसांनी गोवा गाठत बीचवर मजा करत असलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. व्यापाऱ्याला लुटल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. विनय पहुजा असे लुटण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आरोपींनी व्यापाऱ्याकडून 6 लाख 89 हजाराची रोकड लुटली होती. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

संध्याकाळी दुकानातील रक्कम घेऊन घरी चालला होता व्यापारी

विनय पहुजा यांचे उल्हासनगरमध्ये सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्रीचे दुकान आहे. दुकानात जमलेली 6 लाख 89 हजाराची रोख रक्कम घेऊन पहुजा सायंकाळी घरी निघाले होते. यावेळी अंबिका पान सेंटरजवळ त्यांना एका चौकडीने चाकूचा धाक दाखवत अडवलं आणि त्यांना हिरा मॅरेज हॉलच्या एका गल्लीत नेऊन शिवीगाळ आणि मारहाण केली. यानंतर त्यांच्या स्कुटरच्या डिक्कीतून 6 लाख 89 हजारांची रक्कम चोरून हे चोरटे पसार झाले.

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली

हा प्रकार सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. दरम्यान आरोपींची नावं निष्पन्न केल्यानंतर हे सर्व जण गोव्याला फिरण्यासाठी गेले असल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलीस पथकाने चोरीच्या पैशातून मजा मारण्यासाठी गोव्याला गेलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी तात्काळ गोवा गाठलं.

आरोपींच्या गोव्यातून मुसक्या आवळल्या

गोव्यातील बागा बीच परिसरात यापैकी एक आरोपी हा हॉटेलबाहेर टॅटू काढताना पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यानंतर त्याने इतर आरोपींचा ठावठिकाणा सांगताच या सर्वांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना उल्हासनगर येथे आणलं असून, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.