
इंदूरच नवविवाहित जोडपं राजा रघुवंशीची मेघालयमध्ये क्रूर पद्धतीने हत्या झाली. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. सोनम रघुवंशीने प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून भाड्याच्या मारेकऱ्यांना पती राजाच्या हत्येची सुपारी दिली होती. पोलिसांनी याची पृष्टी केली आहे. सोनमचे राज कुशवाहसोबत लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. ती या हत्याकांडाची मास्टरमाइंड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमच्या वडिलांची इंदूर येथे एक छोटी प्लायवूड फॅक्टरी आहे. तिथे राज कुशवाह नोकरी करायचा. सोनम नेहमीच ऑफिसला यायची. इथेच दोघांमध्ये प्रेमसंबंध बहरले. राज कुशवाह सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान होता. पोलिसांनुसार, याच प्रेमसंबंधामुळे सोनमने राज कुशवाहसोबत मिळून राजा रघुवंशी म्हणजे नवऱ्याच्या हत्येचा कट रचला.
इंदूरचा ट्रान्सपोर्ट व्यापारी असलेला राजा रघुवंशी आणि सोनमच 11 मे रोजी धूमधडाक्यात लग्न पार पडलं. लग्नाच्या नऊ दिवसानंतर 20 मे रोजी हे जोडपं हनिमूनसाठी मेघालयला रवाना झालं. 22 मे रोजी भाड्याची स्कूटर घेऊन ते मावलखियाट गावात पोहोचले. 3000 पेक्षा अधिक शिड्या उतरुन नोंग्रियाट गावात ‘लिविंग रूट्स’ पूल पहायला गेले.
कॅफेजवळ बेवारस अवस्थेत सापडली स्कूटर
या कपलने नोंग्रियाटच्या शिपारा होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. 23 मे रोजी सकाळी चेकआऊट केलं. त्यानंतर दोघे बेपत्ता झाले. 24 मे रोजी त्यांची स्कूटर शिलांग-सोहरा मार्गावर सोहरारिम येथे एका कॅफेजवळ बेवारस अवस्थेत सापडली. 2 जून रोजी वेईसावडॉन्ग तळ्याजवळ एका खोल दरीत राजाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाला. 9 जून रोजी सोनम गाजीपूरमध्ये सापडली.
शिलॉन्ग पोलीस गाजीपूरला का येत आहेत?
शिलॉन्ग पोलीस सोनमला ट्रांजिट रिमांडवर घेण्यासाठी गाजीपूर येथे येत आहेत. पोलीस आता या हत्याकांडाच कारस्थान आणि अन्य संशयितांच्या भूमिकेचा सखोल तपास करत आहेत. या प्रकरणात चौथा आरोपी आनंदला अटक केली आहे. सोनमला गाजीपूरमधून अटक करण्यात आली. अन्य तीन आरोपींन इंदूरमध्ये पकडण्यात आलं.