फोनवर पतीशी भांडण, संतापलेल्या पत्नीने 8 महिन्यांच्या मुलीची केली हत्या, मग म्हटले…

Crime News: पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दुखापतीची कोणतीही स्पष्ट चिन्हे नाहीत आणि मृत्यू बुडून झाला आहे. यानंतर पोलिसांनी मयत मुलीची आई जगमती यांची चौकशी सुरू केली. त्यावेळी तिच्या जबाबात तफावत आढळून आली.

फोनवर पतीशी भांडण, संतापलेल्या पत्नीने 8 महिन्यांच्या मुलीची केली हत्या, मग म्हटले...
Crime News
| Updated on: Oct 03, 2024 | 7:02 PM

पती अन् पत्नीच्या भांडणाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पती अन् पत्नीमध्ये फोनवर भांडण झाले. त्यानंतर पत्नी कमालीची संतापले. रागाच्या भरात तिने तिच्या आठ महिन्यांच्या मुलीची हत्या केली. परंतु त्या महिलेने आठ महिन्यांची मुलगी बेपत्ता झाल्याचे सांगितले. पोलिसांच्या तपासात पती-पत्नीच्या भांडणामुळे त्या आठ महिन्यांच्या मुलीची हत्या झाल्याचे समोर आले. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात ही घटना घडली. जगमती नावाच्या महिलेने मुलीची हत्या केली.

29 सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील परसपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या अभयपूर गावात ही घटना घडली. त्या दिवशी त्या पती अन् पत्नीचे फोनवर भांडण झाले. मग महिलेने तिच्या आठ महिन्यांच्या मुलीस सेफ्टीक टँकमध्ये फेकून दिले. त्यानंतर सकाळी मुलगी बेपत्ता झाल्याचा दावा केला. त्या महिलेचे पती मुंबईत राहतात. पत्नी सासऱ्याच्या मंडळीसोबत गावी असते.

शोधासाठी पोलिसांनी लावले ड्रोन

गोंडाचे पोलीस अधीक्षक विनीत जयसवाल म्हणाले की, सोमवारी सकाळी जगमतीने आपली मुलगी शगुन बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. वन्य प्राण्याने तिला पळवून नेले असल्याचा दावा तिने केला. या दाव्यानंतर स्थानिक पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र मुलीचा शोध लागला नाही. मुलीच्या शोधासाठी शेतात ड्रोनही तैनात केले होते.

असा लागला शोध

रविवारी घडलेल्या या घटनेनंतर सोमवारी सायंकाळी पावसाचे पाणी ओसरल्यानंतर जगमती यांच्या घरामागील सेप्टिक टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आला. ते म्हणाले, ‘पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दुखापतीची कोणतीही स्पष्ट चिन्हे नाहीत आणि मृत्यू बुडून झाला आहे. यानंतर पोलिसांनी मयत मुलीची आई जगमती यांची चौकशी सुरू केली. त्यावेळी तिच्या जबाबात तफावत आढळून आली. त्यानंतर तिची कठोर चौकशी केल्यावर तिने हत्येची कबुली दिली. जगमतीने पोलिसांना सांगितले की गेल्या वर्षभरापासून तिचा पतीशी वाद सुरु होता. घटनेच्या रात्री पतीसोबत फोनवरून वाद झाल्याचे सांगितले. रागाच्या भरात तिने मुलीला सेप्टिक टँकमध्ये फेकून दिले. मुलीच्या हत्येप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.