सावधान, सोशल मीडियावरील या खोट्या मेसेजमुळे गरिबांचं जगणं कठीण

| Updated on: Sep 25, 2022 | 10:56 AM

तुम्हालाही व्हॉट्सअपवर मुलं चोरणारी गँग सक्रिय असल्याचा मेसेज आलाय? त्या मेसेजवर विश्वास ठेवण्याआधी सत्य जाणून घ्या!

Follow us on

प्रदीप कापसे, प्रतिनिधी, TV9 मराठी, पुणे : मुलं चोरणारी टोळी (Child kidnapping Gang) सक्रिय आहे, अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या व्हॉट्सअपवर व्हायरल झालेत. त्यामुळे पालक धास्तावलेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक या भागात मुलं चोरणाऱ्या टोळीबाबत अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. आता अशाच प्रकारच्या अफवा पुण्यातही (Pune Crime News) पसरल्यात. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी एक पत्रक काढत लोकांना आवाहन केलंय. पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं पुणे पोलिसांनी म्हटलंय. इतकंच नव्हे, तर असे मेसेज फॉरवर्ड करणारी लोकं आढळली, तर त्यांच्यावर कारवाईदेखील केली जाणार आहे.

पुण्यात मुलं चोरणारी कोणतीही टोळी सक्रिय नाही, असं पत्रकातून पोलिसांनी (Pune Police) स्पष्ट केलंय. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही. पालकांनी सतर्क राहावं आणि अफवांना खतपाणी घालू नये, असं सांगण्यात आलंय. गेल्या काही आठवड्याभरापासून राज्यातील महत्त्वाच्या शहरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

सोशल मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं पोलिसांनी पुणेकरांना म्हटलंय. शाळेतील मुलं पळवून नेली जातात अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, पुण्यात अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत, असं पोलिसांनी पत्रकातून म्हटलंय. पालकांनी घाबरुन न जाता कोणताही संशय आला, तर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, माहितीची शहानिशा न करता खोटी माहिती शेअर करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पुणे पोलिसांनी पत्रकातून दिली आहे. व्हॉट्सअप, फेसबुकसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मेसेज, व्हिडीओ, फोटोच्या माध्यमातून व्हायरल मेसेज पसरवण्यात आले होते.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, याआधी मुंबई पोलिसांनी देखील मुलं चोरणारी टोळी सक्रिय नसल्याचं म्हटलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुलं चोरणारी टोळी आहे समजून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या वाढलेल्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण असल्याचंही अधोरेखित झालं आहे.

नाशिकमध्ये शनिवारी मुलं चोरणारी टोळी समजून एकाला जबर मारहाण करण्यात आली होती. नाशिकच नव्हे तर चाळीसगाव, सांगलीतही मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. गैरसमजूतीन मारहाणीचे प्रकार उघडकीस आले होते. अफवेतूनच हे प्रकार घडल्याचंही पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं. तशी माहितीही स्थानिक पोलिसांनी दिल्यानंतर लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान, अशा घटनांमुळे गावोगावी जावून वस्तू विकणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या समोर रोजी रोटीचा प्रश्नही निर्माण झालाय.