
Raja Raghuvanshi Murder : मध्य प्रदेशातील इंदूर येथील व्यापारी राजा रघुवंशी यांची मेघालयात हत्या झाली होती. त्यांची पत्नी सोनम यांनीच ही हत्या घडवल्याचा आरोप होत आहे. मधुचंद्रासाठी गेलेले हे दाम्पत्य २३ मे रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जून रोजी राजा रघुवंशी यांचा मृतदेह मिळाला. तर ९ जून रोजी राजा यांची पत्नी सोनमला अटक करण्यात आली. त्यानंतर या हत्याकांडाचे गुढ उलगडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमचे दुसऱ्या एका युवकाबरोबर प्रेम होते. त्यामुळे तिने पतीला मधुचंद्राच्या निमित्ताने मेघालयात नेले. त्याच ठिकाणी त्याची हत्या घडवली. या घटनेत सोनमसोबत असलेल्या उत्तर प्रदेशातील तीन आरोपींनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांकडून आणखी एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.
राजा रघुवंशी यांची आई उमा यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सोनमने राजाला न सांगता विमानाचे बुकींग केले होते. राजावर दबाब आणून तिने त्याला शिलांगला नेले. तिने राजाला सोन्याची चेन घालून जाण्याचा आग्रह केला. सोनम गोड गोड बोलत होती. त्यामुळे तिच्या कटाचा संशय कोणाला आला नाही. तिच्यावरील गुन्हा सिद्ध झाला तर तिला फाशीची शिक्षाच दिली पाहिजे.
सोनमचा परिवाराकडून वेगळाच दावा केला जाता आहे. सोनम राजाची हत्या करु शकत नाही, असा दावा सोनमच्या परिवाराने केला आहे. सोनमचे वडील म्हणतात, माझी मुलगी निर्दोष आहे. ती असे काहीच करु शकत नाही. तिला फसवण्यात आले आहे. मेघालय पोलिसांनी एक कथा तयार केली. खऱ्या गुन्हेगारास अटक करण्यात आलेल्या अपयशामुळे सोनमवर आरोप केला जात आहे. या प्रकरणात सीबीआय तपास केला गेला पाहिजे. जोपर्यंत या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले जात नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे सोनमच्या वडिलांनी म्हटले आहे.
सोनमचे वडील म्हणतात, मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. माझी मुलगी या पद्धतीचे कृत्य करुच शकत नाही. शिलाँग पोलिसांनी तयार केलेली कथा घटनांचे विकृतीकरण आहे. त्यांच्याकडे असलेले कथित पुरावे एकतर्फी आहेत. तसेच हे पुरावे सिद्ध होण्यापूर्वीच माध्यमांना दिले आहेत, असा आरोप सोनमच्या वडिलांनी केला.