
Raja Raghuwanshi Murder Case : मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी खून प्रकरण सध्या संपूर्ण देशाच गाजते आहे. राजा रघुवंशी तिची पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासोबत मंधूचंद्र साजरा करायला गेला होता. मात्र याच वेळी त्याचा मृतदेह मेघालयतील शिलाँग येथे खोल दरीत सापडला होता. राजा रघुवंशी याची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता सोनम रघुवंशीने राजा रघुवंशीच्या हत्येची नवी कथा समोर आणली आहे. तिने अनेक धक्कादायक दावे केले आहेत.
राजा रघुंवशीची हत्या झाल्यापासून त्याची पत्नी सोनम रघुवंशी ही गेल्या दोन आठवड्यांपासून फरार होती. पोलीस तिचा शोध घेत होते. आता मात्र तिला उत्तर प्रदेशातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राजा रघुवंशीच्या हत्येत तिचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. सोनम मात्र ती निर्दोष असल्याचा दावा करत आहे.
या खून प्रकरणात सोनम रघुंवशी हिच्यासोबतच अन्य चार जणांना अटक करण्यात आली आहे. 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह खोल दरीत सापडला होता. त्याच वेळी सोनम मात्र फरार होती.
मिळालेल्या माहितीनुसार सोनम ती निर्दोष असल्याचा दावा करत आहेत. सोबतच मी निर्दोष असून या प्रकरणात एक पीडित आहे, असंही ती सांगत आहे. विशेष म्हणजे मी फरार झाले नव्हते तर माझं कोणीतरी अपहरण केलं होतं. माझं अपहरण करून मला उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे सोडून देण्यात आलं होतं. गाझीपूरमध्ये मला सोडून दिल्यानंतर मी लगेच माझ्या भावाला कॉल केला, असा दावा ती करत आहे. सोनमचा कॉल आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी लगेच पोलिसांना सांगितले आणि नंतर पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्याचे म्हटले जात आहे. तिच्या या खळबळजनक दाव्यांमुळे आता नेमकं सत्य काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील दोन आरोपींना मध्य प्रदेशमधील इंदौर येथून अटक करण्यात आली आहे. तर एकाला उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथून अटक करण्यात आलीये. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे नाव राज कुशवाह, विशाल चौहान आणि आकाश राजपूत असे आहे.