आधी मारहाण, नंतर गोळ्या घातल्या; कोण आहेत प्रदीप पूर्णेकर?
ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूर्णेकर यांना आधी मारहाण करून दोन राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. सामाजिक कार्यात सक्रिय, ड्रग्स रॅकेट आणि पुनर्विकासाविरोधात लढणारे पूर्णेकर राजन विचारे यांचे जवळचे मानले जात. या घटनेने ठाण्यात तणाव असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी काही हल्लेखोरांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दोन राऊंड फायर करण्यात आल्याने पूर्णेकर गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेलं असता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण ठाणे शहर हादरून गेलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पूर्णेकर हे सामाजिक कार्यात आघाडीवर होते. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण ठाणे शहरावर शोककळा पसरली आहे.
कोण आहेत पूर्णेकर?
प्रदीप पूर्णेकर हे ठाकरे गटाचे ठाण्यातील विभाग प्रमुख होते. त्यांना बाळू नावानेही ओळखलं जात होतं. माजी खासदार राजन विचारे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ते परिचित होते. गेल्या वर्षी ठाणे महापालिकेची निवडणूक पार पडली. पूर्णेकर यांची पत्नी विजेता पूर्णेकर यांनी ही निवडणूक लढवली होती. तसेच त्यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनीही ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली होती. जयनाथ पूर्णेकर हे ठाणे महापालिकेतील माजी नगरसेवक आहेत.
सामाजिक कार्यात आघाडीवर
पूर्णेकर हे मनोरमा नगरमध्ये राहायला होते. तिथेच त्यांचं ऑफिसही आहे. मनोरमा नगरमध्ये पूनर्विकासाची कामे सुरू आहेत. यावेळी ते नागरिकांच्या बाजूने लढत होते. तसेच ठाण्यातील ड्रग्स रॅकेट विरोधातही ते लढत होते. तशी माहिती ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
नेमकं काय घडलं?
काल रात्री पूर्णेकर त्यांच्या मनोरमा नगरमधील ऑफिसमध्ये बसलेले असताना काही हल्लेखोरांनी त्यांना आधी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यावर दोन राऊंड गोळ्या झाडून फरार झाले. या हल्लेखोरांनी तोंडाला मास्क लावले होते. हेल्मेट घालून आले होते. या हल्ल्यानंतर पूर्णेकर यांना घोडबंदर रोडवरील मॉलच्या जवळील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
ठाण्यात नाकाबंदी
गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी मुख्य मार्गांवर नाकाबंदी केली होती. तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यात तणावाचे वातावरण आहे.