
जॉइंट एन्ट्रान्स एक्झाम (जेईई) मेन 2026 सत्र 1 ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आह. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर केला आहे. यंदा 12 उमेदवारांना 100 पर्सेंटाईल मिळाले आहे. याचाच अर्थ या सर्वांनी या परीक्षेत पहिला नंबर मिळवला आहे. यात महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्याचाही समावेश आहे. त्यातबरोबर ही परीक्षा दिलेल्या एकूण उमेदवारांपैकी 96.26 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एनटीएने 21 ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत जेईई मेन 2026 सत्र 1 ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. बीई आणि बी.टेक प्रोग्राम्समध्ये प्रवेश देणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण 13,55,293 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13,04,653 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात भारतातील सर्व उमेदवार तसेच काठमांडू, दुबई आणि कुवेत सारख्या परदेशी केंद्रांमधील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. एनटीएने सांगितले की एकूण उमेदवारांपैकी 96.26 % उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
जेईई मेन 2026 सत्र 1 परीक्षेत कमी मार्क्स मिळाले असतील तर त्या विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये आणखी एक संधी मिळणार आहे. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना दोन्ही सत्रांमधील सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची आहे ते सत्र 2 साठी नोंदणी करू शकतात. एप्रिलची परीक्षा 2 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी ही आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.