Aditi Sarangdhar: गरोदरपणात 9 महिने बिअर प्यायले; ट्रोलिंगनंतर अदिती सारंगधरने सांगितला डोहाळ्यांचा किस्सा
Aditi Sarangdhar: अभिनेत्री अदिती सारंगधरने एका मुलाखतीत गरोदरपणात बिअर पिण्याचे डोहाळे लागल्याचा खुलासा केला होता. यावरून बरीच ट्रोलिंगसुद्धा झाली होती. त्यानंतर आता तिने तिच्या विचित्र डोहाळ्यांचा किस्सा सांगितला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर हिने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या गरोदरपणातील चकीत करणारा अनुभव सांगितला होता. गरोदरपणात अदितीला चक्क बिअर पिण्याचे डोहाळे लागले होते. तिच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं होतं, अनेकांनी अदितीला ट्रोलसुद्धा केलं होतं. आता दोन वर्षांनंतर अदितीने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “मी बाहेरचा वडापाव अनेक वर्षे खाल्ला नव्हता. मी बाहेरचं जेवण अनेक वर्षे जेवले नव्हते. सतत न्यूट्रिशन फॉलो करणाऱ्या माझ्यासारखीला असे भन्नाट डोहाळे लागले होते,” असं अदिती म्हणाली.
‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत अदिती म्हणाली, “मला बिअर पिण्याचे डोहाळे लागलेच होते. मी अगदी गटागटा वगैरे पित नव्हती. लोकांनी त्याचं चर्वण केलं. पण ज्याला होतं, त्यालाच ते कळतं. मी मद्यपान करत नाही. पार्ट्यांमधली सर्वांत दु:खी प्राणी मीच आहे. माझी 9 ची झोपायची वेळ झाली की मी निघते आणि मित्रमैत्रिणींना सांगते की तुमचं चालू द्या. मी सात वाजता जेवून 9 वाजता झोपणारी व्यक्ती आहे. पण गरोदरपणात मला वाटलं तसं. मी पाणीसुद्धा खूप थंड पिऊ लागले होते. इतकं थंड पाणी मी कधीच आयुष्यात पित नव्हती. मग बिअरचा एक घोट पिऊ लागले. मी काय अख्खी बाटली संपवायचे नाही. बिअरचा वास आणि एखादा घोट.. असंच सुरू होतं. त्यावेळी मला तसं वाटत होतं. नाहीतर माझी चिडचिड व्हायची.”
“काही दिवसांनी मला चिंच खायचे डोहाळे लागले होते. एका चित्रपटाच्या डबिंगच्या वेळी मी तीन तासांत चिंचेचा अख्खा गोळा संपवला होता. मी अशी नव्हतीच. मी माझं डाएट खूप गांभीर्याने पाळायची. मी बाहेरचा वडापाव अनेक वर्ष खाल्ला नव्हता. मी बाहेरचं जेवण अनेक वर्षे जेवले नव्हते. सतत न्यूट्रिशन फॉलो करणाऱ्या माझ्यासारखीला असे भन्नाट डोहाळे लागले होते. उलट्यांचा तर भयानक त्रास व्हायचा. मी नऊ महिन्यांपर्यंत दिवसाला 25-25 उलट्या करायचे. त्यामुळे मला अनेक प्रोजेक्ट बंद करावे लागले होते,” असं ती पुढे म्हणाली.
काय म्हणाली होती अदिती सारंगधर?
‘आरपार ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत अदितीने सांगितलं होतं, “गरोदरपणात मला बिअर प्यायचे डोहाळे लागले होते. मी प्रेग्नंसीमध्ये बिअर प्यायचे. मी डॉक्टरांना विचारलं होतं की, मी काय करू? बिअर प्यायले नाही तर मला राग यायचा भयंकर. मग डॉक्टर म्हणाल्या की दोन-दोन सीप प्या. मग मी 9 महिने बिअर प्यायले. मी गरोदरपणात इंडियन फूडसुद्धा खात नव्हते. कारण जेवणातील एक-एक मोहरी काढून मी बाजूला करायचे.” तिच्या या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती.
