
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांचे विविध व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. सतत आनंदी राहणारं कपल.. म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या डान्सचे व्हिडीओ सहसा सोशल मीडियावर व्हायरल होतात. परंतु यावेळी मात्र त्यांच्या नाही तर त्यांच्या मुलाच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा मुलगा अमेय नारकरचा हा व्हिडीओ एअरपोर्टवरील आहे. एअरपोर्टवर अचानक एक मुलगी येऊन त्याला आनंदाने मिठी मारते आणि अमेयसुद्धा तिला भेटून खूप खुश झाल्याचं पहायला मिळतं.
हा व्हिडीओ अभिनेत्री ईशा संजयने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती एअरपोर्टवर अमेयला घट्ट मिठी मारताना दिसतेय. त्याचसोबत अमेयसुद्धा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो. ‘अखेर हे घडलं.. थू थू थू’ असं कॅप्शन लिहित ईशाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यासोबतच तिने नजर लागू नये या विचाराने ‘नजर’चे इमोजी पोस्ट केले आहेत. दोघांचा हा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर ऐश्वर्या नारकर यांनीसुद्धा कमेंट केली आहे. ऐश्वर्या यांनी कमेंटमध्ये हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत.
अमेयला मिठी मारणारी ही अभिनेत्री ईशा संजय त्याची गर्लफ्रेंडच आहे. हे दोघं गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. ईशा सध्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत काम करतेय. या मालिकेत ती सूर्यादादाच्या चार बहिणींपैकी एकीची भूमिका साकारतेय.
अमेयने रुईया कॉलेजमधून बीएमएमचं शिक्षण घेतलंय. त्यालाही अभिनयाची आवड असून त्याने बऱ्याच एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केलंय. गेल्याच वर्षी त्याने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलंय. आईवडिलांसारखंच अमेयलाही डान्सची फार आवड आहे. अमेय आणि ईशाच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ईशाने ललित कला केंद्रातून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. ती भरतनाट्यमसुद्धा शिकली आहे. ईशाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या डान्सचे बरेच व्हिडीओ पहायला मिळतात. ईशा आणि अमेयने एकत्र नाटकांमध्येही काम केलंय.