Ajay Devgn: कपिलच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख, अजय देवगणने चेहराच झाकला.. त्या नोटिशीची पुन्हा चर्चा
Ajay Devgn: 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये तुकाराम मुंढे यांचा उल्लेख होताच त्यावर अजय देवगणची प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढेंच्या एफडीएने त्याला नोटीस पाठवली होती.

Ajay Devgn: नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये ‘दृश्यम 3’च्या टीमने हजेरी लावली होती. अभिनेता अजय देवगण, जयदीप अहलावत आणि चित्रपटाच्या टीमसोबतचा हा खास एपिसोड चांगलाच चर्चेत आला आहे. शोमध्ये नेहमीप्रमाणे कलाकारांनी धमाल-मस्ती केली. मात्र यावेळी महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्याचा उल्लेख झाल्यानंतर अजय देवगणची प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नाव शोमध्ये विनोदी पद्धतीने घेण्यात आलं. शोमध्ये किकू शारदा महिलेच्या वेशात दिसत होता. यावेळी त्याने जयदीप अहलावतसमोर तुकाराम मुंढे यांचा उल्लेख केला. तुकाराम मुंढे सध्या इथे-तिथे फिरत असून, ते कधीही येऊन छापा टाकू शकतात, असा विनोदी संवाद किकूने केला. त्यावर कृष्णा अभिषेकनेही आपल्या खास अंदाजात त्याची फिरकी घेतली.
कृष्णा अभिषेकने किकूला, “तू काय नाश्त्यामध्ये गाढव खाऊन आलीस का?” असा मिश्कील सवाल केला. त्यानंतर मिलावट करणाऱ्यांवर कारवाई केली जाते, अहलावत यांच्यावर नाही, असं म्हणत त्याने विनोदाचा पुढचा टप्पा गाठला. हा संवाद ऐकताच जयदीप अहलावतसह सेटवरील सर्व कलाकारांमध्ये एकच हशा पिकला.
अजय देवगणची प्रतिक्रिया व्हायरल
या संपूर्ण प्रसंगात मात्र अजय देवगणच्या चेहऱ्यावरील भावांनी विशेष लक्ष वेधून घेतलं. किकू आणि कृष्णाच्या संवादानंतर अजयने अक्षरशः चेहऱ्यावर हात ठेवत लाजत हसण्याची प्रतिक्रिया दिली. त्याची ही प्रतिक्रिया पाहून शोमधील वातावरण आणखी रंगले. सोशल मीडियावरही अजयच्या या रिॲक्शनची चर्चा होण्याची शक्यता आहे.
पहा व्हिडीओ-
‘विमल’च्या जाहिरातीप्रकरणी नोटीस
तुकाराम मुंढे यांचा उल्लेख होताच अजय देवगणची प्रतिक्रिया चर्चेत येण्यामागे आणखी एक कारण आहे. यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाशी संबंधित एका प्रकरणात तुकाराम मुंढे यांनी ‘विमल’च्या जाहिरातीच्या संदर्भात अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये तुकाराम मुंढेंचा विनोदी उल्लेख होताच अजयची प्रतिक्रिया पाहून चाहत्यांना त्या प्रकरणाची आठवण झाली.
‘दृश्यम 3’च्या प्रमोशनदरम्यान झालेल्या या मजेशीर प्रसंगामुळे चित्रपटाच्या टीमसोबतच तुकाराम मुंढेंचे नावही पुन्हा चर्चेत आलं आहे. अजय देवगणची अनपेक्षित प्रतिक्रिया हा या संपूर्ण प्रसंगातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.