तो अडल्ट सिनेमा..; रणवीरच्या ‘धुरंधर 2’बद्दल काय म्हणाला अक्षय कुमार?

अक्षय कुमारचा 'भूत बंगला' हा चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाचा बोलबाला आहे. त्याविषयी अक्षयने त्याचं मत मांडलं आहे..

तो अडल्ट सिनेमा..; रणवीरच्या धुरंधर 2बद्दल काय म्हणाला अक्षय कुमार?
Akshay Kumar and Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2026 | 3:52 PM

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पेड प्रीव्ह्यू आणि त्यानंतर जबरदस्त ओपनिंग केल्यानंतर दररोज हा चित्रपट कोट्यवधी रुपयांची कमाई करतोय. प्रेक्षक, समिक्षक आणि सेलिब्रिटींकडून या चित्रपटाचं कौतुक होत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या तीन महिन्यांपासून प्रतीक्षा करत होते. त्यामुळे जोपर्यंत ‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर आहे, तोपर्यंत दुसरे चित्रपट टिकणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला जातोय. अशातच अभिनेता अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा कॉमेडी चित्रपट येत्या 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘धुरंधर 2’च्या लाटेचा या चित्रपटाला काही फटका बसेल का, असा प्रश्न त्याला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारण्यात आला.

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर 2’समोर ‘भूत बंगला’ टिकू शकेल का, असा सवाल केला असता अक्षय म्हणाला, “रणवीर सिंहचा धुरंधर: द रिव्हेंज हा चित्रपट इतकी चांगली कामगिरी करत असल्याचं पाहून मला फार आनंद होतोय. या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीला एका नव्या उंचीवर पोहोचवलं आहे आणि ही अत्यंत उत्साहवर्धक बाब आहे. सर्वसामान्यपणे तीन आठवड्यांचा वेळ पुरेसा असतो आणि इथे आपण 21 दिवसांबद्दल बोलत आहोत. हा चित्रपट इंडस्ट्रीसाठी चांगली कामगिरी करतोय. जर चित्रपट चांगलं परफॉर्म करणार नसेल तर अशा प्रकारच्या चर्चांसाठी कोणतंच प्लॅटफॉर्म शिल्लक राहणार नाही.”

अक्षय कुमारला पुढे असंही विचारण्यात आलं की, त्याचा चित्रपट सध्याच्या अॅक्शनपटांच्या लाटेला उत्तर देण्यासाठी बनवला आहे का? त्यावर तो म्हणाला, “माझ्या टीमने चित्रपट बनवताना कोणताही ट्रेंड फॉलो केला नाही. त्याऐवजी त्यांनी संपूर्ण लक्ष कथेच्या ताकदीवर केंद्रीत केलं आहे. ‘धुरंधर 2’ हा अडल्ट प्रेक्षकांसाठी आहे, तर भूत बंगला हा अधिकाधिक प्रेक्षकवर्गासाठी बनवण्यात आला आहे. हा चित्रपट लहान मुलं आणि कुटुंबीय एकत्र बसून बघू शकतात. रणवीरचा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. त्यात अॅक्शन आहे आणि तो अडल्ट चित्रपट आहे. तर आमचा कौटुंबिक चित्रपट आहे. आमच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की सर्व चित्रपट चालले पाहिजेत, इंडस्ट्रीसाठीही ही चांगली गोष्ट आहे.”

‘भूत बंगला’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत तब्बू, वामिका गब्बी, राजपाल यादव आणि परेश रावल यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. येत्या 10 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us