Amitabh Bachchan Birthday : 45 वर्षांपूर्वीचं गाणं, 394 मिलियन व्ह्यूज; आजही प्रेमी जोडप्यांच्या मनावर या गाण्याची जादू!
१९८१ मध्ये आलेला एक बॉलिवूड सिनेमा आजही सिनेप्रेमींना आणि बच्चन यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. यातील एक गाणं तब्बल ३९४ मिलियन व्ह्यूजपर्यंत जाऊन पोहोचलं आहे.

भारताच्या चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच सर्वात नाव म्हणजे बिग बी. अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. आज ते ८४ वर्षांचे झाले. गेल्या ५० वर्षांपासून ते भारतीय सिनेविश्वात काम करत आहेत. या पाच दशकांच्या त्यांच्या कामावर बोलायला गेलं तर एक लेख काय असे हजारे लेखही कमी पडतील, एवढी मोठी आणि विविधांगी अशी त्यांची कारकीर्द आहे. त्यामध्ये त्यांचे सिनेक्षेत्रातलं जीवन अन् वैयक्तिक जीवन अशा दोन बाजूही आहेत. पण आज आपण त्यांच्या एका अशा गाण्याबद्दल बोलणार आहोत, जे आजही तरुणांच्या ओठी असतं.
अमिताभ यांनी जवळपास २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एकूण कारकीर्दीत अनेक मौल्यवान चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यापैकीच एक आहे ‘सिलसिला’. हा सिनेमा १९८१ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा म्हणजे बच्चन प्रेमींसाठी जीव की प्राण आहे. बच्चन यांच्या कारकीर्दीतील हा सिनेमा सर्वात चर्चित असा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच चित्रपटातील गाण्याने प्रेक्षकांना लावलेलं वेड अनेक वर्षांनंतरही काही कमी होत नाही.
या गाण्याला २०२६ पर्यंत ३९४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं ४५ वर्षांचं झालं आहे, तरीही प्रेम करणाऱ्या जोडप्यांच्या मनाला भूरळ घालतं. हे गाणं प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. ‘देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए’, असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं म्हणजे केवळ एक गाण नसून प्रेमाची सुंदर आणि खास अनुभूती आहे. त्यामुळे हे गाणं आजही इन्स्टाग्राम रील्सवर कपल्सची पहिली पसंती आहे.
या गाण्याला लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी त्यांचा आवाज दिला आहे. तर गिताचे बोल जावेद अख्तर यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे संगीतकार शिव-हरी हे आहेत. ४ मिनिटे २७ सेकंदाच्या या गाण्याला मागील १० वर्षांमध्ये ३९४ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
८० च्या दशकात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या जोडीला खूप प्रेम मिळायचं. दोघांना ऑनस्क्रीन पाहायला चाहत्यांना फार आवडायचं. हे गाणं नेदरलँडमधील सुंदर ट्यूलिप गार्डनमध्ये चित्रित करण्यात आलं होतं. आता काळ बदलला असला तरीही हे गाणं आजही लोकांना तितकचं आकर्षित करतं. सोशल मीडियावर जेनझी तरुण तरुणीही या गाण्यावर रील्स काढतात.